सह्याद्री न्यूज नेटवर्क |
मुंबई, (१८ जुलै) : शनिवारी रात्रीपासून रौद्ररुप धारण केलेल्या पावसाने मुंबईत हाहाकार उडाला असतानाच हवामान विभागाने मुंबईसह लगतच्या चार जिल्ह्यांत अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे मुंबईसह या चार जिल्ह्यांत पुढील तीन तास धोक्याचे असणार आहेत.
मुंबई शहर आणि उपनगरात शनिवारी रात्रीपासून मुक्काम ठोकलेल्या पावसामुळे सगळीकडे पाणीच पाणी झाले आहे. मुंबईतील सखल भागांत पाणी तुंबले आहे. आज रविवारी दुपारी कमी झालेला पावसाचा जोर दुपारी चार वाजेनंतर पुन्हा वाढला आहे. त्यातच आता हवामान विभागाने अतिमुसळधार पावसाचा इशारा दिल्यामुळे मुंबईकरांची चिंता वाढली आहे.
आज दुपारी चार वाजेनंतर मुंबई शहर आणि उपनगरासह शेजारच्या जिल्ह्यांत मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि रत्नागिरी या चार जिल्ह्यांत अतिमुसळधार पाऊस होईल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. पुढील तीन तासांत या चारही जिल्ह्यांत अतिमुसळधार पाऊस होईल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.
चेंबूर, विक्रोळीत दुर्घटना, मृतांच्या वारसांना ५ लाख रुपयेः मुंबईत मध्यरात्रीपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे चेंबूर आणि विक्रोळी येथे झालेल्या दुर्घटनेत झालेल्या मृत्यूसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी पालिका आयुक्तांकडून बचाव कार्याची माहिती घेतली. एनडीआरएफ, महानगरपालिका, अग्निशामक दल आणि पोलीस यांनी समन्वयाने बचाव कार्य सुरु ठेवावे व जखमींना तातडीने रुग्णालयांत हलवून व्यवस्थित उपचार मिळतील असे पाहण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. मृतांच्या वारसांना शासनाकडून प्रत्येकी ५ लाख रुपये देण्याचे आणि जखमींवर मोफत उपचार केले जातील असेही त्यांनी जाहीर केले आहे.
मुंबईत रात्रभर पाऊस सुरु असून मुख्यमंत्री स्वत: पालिकेच्या नियंत्रण कक्षाकडून सातत्याने माहिती घेत आहेत. आजही पाऊस सुरूच राहणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज असल्याने सर्व यंत्रणांनी सज्ज राहावे व कुठेही दुर्घटना घडल्यास त्वरित बचाव कार्य सुरु ठेवावे व मदत पोहचवावी असेही त्यांनी निर्देश दिले आहेत. मुंबईतील मिठी नदी व इतर मोठ्या नाल्यांलगत पाणी वाढल्यास आसपास राहणाऱ्या रहिवाशांना मोठ्या प्रमाणावर त्रास होऊ शकतो हे पाहून त्यांना प्रसंगी स्थलांतरित करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत.
कोविड संसर्ग लक्षात घेऊन जम्बो केंद्रामधील रुग्ण तसेच इतर साधन सामुग्री यांची काळजी घ्यावी व सावध राहण्यास देखील मुख्यमंत्र्यांनी पालिकेस सांगितले आहे. पावसामुळे जिथे जिथे पाणी साचले आहे त्या ठिकाणी पाण्याचा निचरा करणारी यंत्रणा व्यवस्थित कार्यान्वित करावी, रस्ते मोकळे करावेत , वाहतुकीवर परिणाम झालेला आहे. मात्र, लवकरात लवकर ती सुरळीत होईल असे पाहावे, रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी देखील रेल्वे वाहतूक कशी पूर्ववत होईल हे बघण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी आज प्रशासनाला दिल्या.
मुंबईसह चार जिल्ह्यांत अतिमुसळधार पावसाचा इशारा, पुढील तीन तास धोक्याचे!
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
July 18, 2021
Rating:
