सह्याद्री न्यूज नेटवर्क |
चंद्रपूर, (१० जुलै) : सावली तालुक्यात सिंचनाची सोय व्हावी म्हणून आसोलामेंढा तलावात २०१७ साली पाणी आणण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. या तालुक्यात सिंचनासाठी आतापर्यंत ४७० कोटी रुपये देण्यात आले आहे. तसेच सिमेंटचे रस्ते, सार्वजनिक सभागृह, विश्रामगृहाचे बांधकाम आदी कामांसाठी गत एक वर्षात १२२ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या भागाच्या विकासाला आपले प्राधान्य असून सिंचन आणि विकासाच्या बाबतीत सावली तालुक्याला अग्रेसर बनविणार, अशी ग्वाही आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.
सावली तालुक्यात व्याहाड खुर्द येथे शासकीय विश्रामगृहाच्या इमारतीच्या बांधकामाचे तसेच सामाजिक सभागृहाच्या बांधकामाचे भूमिपूजन करतांना ते बोलत होते. यावेळी पंचायत समिती सभापती विजय कोरेवार, व्याहाड खुर्दच्या सरपंचा सुनिता उरकुडे, उपसरंपच भावना विके, मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक संदीप गड्डमवार, दिनेश चिटनुरवार, राजू सिद्दाम, राकेश गट्टमवार, कृउबासचे सभापती युवराज शेळके, केशव वरडकर, दिपक जवादे आदी उपस्थित होते.
नागरिकांना मुलभूत सुविधा उपलब्ध करून देणे व विकासाचे प्रश्न तातडीने मार्गी लावणे, हेच आपले ध्येय आहे, असे सांगून पालकमंत्री श्री. वडेट्टीवार म्हणाले, सावली तालुक्यातील १२ - १३ गावात सामाजिक सभागृहाचे बांधकाम हाती घेण्यात आले आहे. यात पाथरी, तराडो, व्याहाड खुर्द, व्याहाड बुज, अंतरगाव, उपरी आदी गावांचा समावेश आहे. एक हजार लोकांच्या क्षमतेचे हे सभागृह राहणार असून गरीबांच्या घरचे कार्यक्रम येथे करता येतील. व्याहाड खुर्द येथील विश्रामगृहाच्या इमारतीकरीता १ कोटी ८६ लक्ष तर संरक्षण भिंतीकरीता अतिरिक्त ५० लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. पाणी पुरवठ्याच्या सर्व योजना विकसीत करण्यात येणार असून जलसंधारणाअंतर्गत बंधारे बांधण्याकरीता ३२ कोटींचे नियोजन करण्यात आले आहे.
नागरिकांना पिण्याचे थंड पाणी उपलब्ध व्हावे म्हणून या भागातील ८६ गावात १४ कोटी रुपये खर्च करून वॉटर एटीएम बसविण्यात येणार आहे. गांगलवाडी ते व्याहाड या दोन तालुक्यांना जोडणारा सिमेंटचा रस्ता तयार करण्यात येणार आहे. तसेच यावर मोठे पुलांची निर्मितीसुध्दा करण्यात येईल. यासाठी ९८० कोटींचे नियोजन आहे. सावली तालुक्यात शेवटच्या टोकापर्यंत सिंचनाचे पाणी पोहचावे, यासाठी गोसेखुर्द धरणातून पाणी सोडण्याचे निर्देश संबंधितांना देण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी वादळात घराचे नुकसान झालेल्या शकुंतला ठय्ये यांना १५ हजार रुपयांचा धनादेश तर कोरोनामुळे मृत्यु झालेल्या कोहळे कुटुंबाला २० हजार रुपयांचा धनादेश पालकमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन नितीन गोहणे यांनी केले. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता सी.बी. कटरे, शाखा अभियंता एस.डी. राऊत यांच्यासह गावातील केशव वरडकर, निखील सुरमवार, आशिष पुण्यवार तसेच गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तत्पूर्वी पालकमंत्री वडेट्टीवार यांनी चेकपिरंजी येथे कोरोनामुळे निधन झालेल्या चौधरी कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली.
७ कोटी २६ लक्ष रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन
पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते सावली तालुक्यात एकूण ७ कोटी २६ लक्ष रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. यात व्याहाड खुर्द येथील शासकीय विश्रामगृह बांधकामकरीता १ कोटी ८६ लक्ष रुपये, २५ / १५ अंतर्गत
सामाजिक सभागृह बांधकामाकरीता ३० लक्ष रुपये, व्याहाड बुज येथे सामाजिक सभागृह भूमिपूजन ३० लक्ष रुपये, सामदा बुज येथे सामदा बुज – व्याहाड बुज – सोनापूर – पेडगाव – भान्सी – उपरी या रस्त्याचे भूमिपूजन ३ कोटी ५० लक्ष रुपये, सामाजिक सभागृह बांधकाम ३० लक्ष रुपये, सामदा – शिवणी रस्त्यावरील पुलाचे बांधकाम ८४ लक्ष रुपये आदींचा समावेश आहे.
लसीकरण जनजागृती मोहिमेच्या चित्ररथाला हिरवी झेंडीकोरोनावर प्रभावी उपाय म्हणुन लसीकरणावर भर दिला जात आहे. शहरी तसेच ग्रामीण भागातील नागरीकांचे कोविड-१९ लसीकरणाबाबत असलेले गैरसमज दूर करून जनजागृती व प्रबोधन करण्यासाठी जिल्ह्यामध्ये लसीकरण जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेची सुरुवात ७ जुलै रोजी करण्यात आली असून आज व्याहाड खुर्द येथे जिल्हयाचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी चित्ररथाला हिरवी झेंडी दाखवत शुभारंभ केला.
नागरिकांनी लसीकरणाबाबत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. लस ही पूर्णपणे सुरक्षित आहे. या जनजागृती मोहिमेदरम्यान चित्ररथ, पोस्टर्स, स्टीकरशीट, जिंगल्स, हँडबील आदींच्या माध्यमातून शहरी व ग्रामीण भागात लसीकरणाबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.
