(संग्रहित फोटो)
सह्याद्री न्यूज नेटवर्क |
नवी दिल्ली, (ता.५) : मोबाइलच्या 5G तंत्रज्ञानाच्या विरोधात याचिका दाखल करणे अभिनेत्री जुही चावलाला चांगलेच महागात पडले आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने जुही चावलाची याचिका फेटाळून लावतानाच तिचे दाखल केलेली याचिका ही स्टंटबाजी असल्याचे सांगत दिल्ली उच्च न्यायालयाने तिला २० लाखांचा दंडही ठोठावला आहे.
मोबाइल टॉवरच्या विकीरणांमुळे पर्यावरण तसेच मानवी आरोग्याला धोका असल्याचे गेल्या काही वर्षांपासून जुही चावला सांगत आहे. या तंत्रज्ञानाविरोधात तिने कायम विरोधाची भूमिका घेतली आहे. त्याचाच एक भाग म्हणून मोबाइलच्या 5G तंत्रज्ञानाला आव्हान देणारी याचिका तिने दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केली होती.
जुही चावलाची ही याचिका फेटाळून लावताना दिल्ली उच्च न्यायालयाने अनेक प्रश्नांची सरबत्ती केली आहे. जुहीची याचिका हा पब्लिसिटी स्टंट आहे. याचिका दाखल करण्याआधी जुही चावलाने हा प्रश्न सरकारकडे मांडला होता का? मोबाईलच्या ५ तंत्रज्ञानाविरोधातील जुही चावलाचे म्हणणे सरकारने ऐकले नाही, असे घडले आहे का? सरकारने तुमच्या हक्कांवर गदा आणली आहे, असा प्रकार घडला आहे का? असे प्रश्न न्यायालयाने उपस्थित केले.
जुही चावलाची भूमिकाः आधुनिक तंत्रज्ञानाला माझा विरोध नाही. मात्र 5G तंत्रज्ञानामुळे पर्यावरणाची हानी होणार नाही, हे मोबाईल कंपन्यांनी पटवून दिले पाहिजे. मी मोबाईलच्या 5G तंत्रज्ञानाच्या विरोधात नाही, परंतु हे तंत्रज्ञान मानवी आरोग्यास अपायकारक आहे की नाही, याबाबतची भूमिका सरकारने स्पष्ट केली पाहिजे, असे जुही चावलाचे म्हणणे आहे.
