सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना मारेगाव पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या अनेक गावांमध्ये मान्सूनपूर्व नाली सफाई आणि विशेष स्वच्छता मोहिमेची अद्याप प्रभावी अंमलबजावणी सुरू झालेली दिसत नाही. दरवर्षी पावसाळ्यात नाल्या तुंबणे, साचलेल्या पाण्यामुळे डासांची उत्पत्ती वाढणे आणि नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे यंदा तरी पावसापूर्वीच नियोजनबद्ध पद्धतीने स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी नाल्यांमध्ये गाळ, कचरा आणि झाडाझुडपे साचलेली असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे, ग्रामपंचायतींकडे स्वच्छता मोहिमांचे नियोजन असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात अनेक गावांमध्ये कामांना सुरुवात झालेली नाही. लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत पदाधिकारी आणि संबंधित अधिकारी यांनी गावात उपस्थित राहून मोहिमेचा शुभारंभ करावा व कामांचा नियमित आढावा घ्यावा, अशी अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.
पावसाळ्यापूर्वी नाली सफाई व स्वच्छता मोहीम प्रभावीपणे राबविणे ही केवळ औपचारिकता नसून सार्वजनिक आरोग्याशी निगडित बाब आहे. त्यामुळे पंचायत समिती प्रशासनाने तातडीने सर्व ग्रामपंचायतींना निर्देश देऊन प्रत्यक्ष कामांना सुरुवात करावी, अशी मागणी जोर धरत आहे. अन्यथा पावसाळा सुरू झाल्यानंतर उद्भवणाऱ्या समस्या आणि त्यातून होणाऱ्या गैरसोयींसाठी संबंधित यंत्रणेलाच जबाबदार धरले जाईल, अशी भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.