सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : तालुक्यातील मार्डी परिसरासह आसपासच्या गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वारंवार होणाऱ्या वीज खंडित होण्याच्या प्रकारामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर रात्रीच्या वेळी होणाऱ्या सततच्या वीज खंडितीमुळे नागरिकांची झोप उडाली असून लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांना विशेषतः मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, रात्रीच्या वेळी अनेकदा अचानक वीज पुरवठा खंडित होतो. काही वेळाने वीज येते आणि पुन्हा जाते, त्यामुळे नागरिकांना अक्षरशः "विजेचा लपंडाव" अनुभवावा लागत आहे. या वारंवार होणाऱ्या खंडितीमुळे घरगुती उपकरणांनाही धोका निर्माण झाला असून विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरही विपरीत परिणाम होत आहे.
मार्डी उपकेंद्राच्या कार्यपद्धतीबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. वीज पुरवठा खंडित होण्यामागील कारणांची माहिती नागरिकांना वेळेवर मिळत नसल्याने संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. नियोजित देखभाल दुरुस्ती असेल किंवा तांत्रिक बिघाड, याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती दिली जात नसल्याची ओरड नागरिकांतून होत आहे.
दरम्यान, दिवसभर कडक उन्हाचा सामना केल्यानंतर रात्री तरी अखंडित वीज मिळेल, अशी अपेक्षा असते. मात्र रात्रीच वारंवार वीज गुल होत असल्याने नागरिकांच्या संयमाचा बांध फुटू लागला आहे. वाढत्या तापमानामुळे पंखे, कुलर आणि इतर विद्युत उपकरणांवर अवलंबून असलेल्या नागरिकांची अक्षरशः जीवाची लाही-लाही होत असल्याचे चित्र आहे.
स्थानिक नागरिकांनी संबंधित वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत असून मार्डी उपकेंद्रातील तांत्रिक अडचणी, मनुष्यबळाची कमतरता अथवा इतर कारणे तातडीने दूर करून नियमित व अखंडित वीज पुरवठा सुनिश्चित करावा, अशी मागणी जोर धरत आहे.
"रोजच रात्री वीज का जाते? यामागील नेमके कारण काय?" असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात असून, प्रशासन आणि वीज वितरण कंपनीने त्वरित उपाययोजना करून जनतेला दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.