सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : पुणे येथून प्रकाशित होणाऱ्या साप्ताहिक स्टिंग ऑपरेशन या वृत्तपत्राच्या विदर्भ ब्युरो चीफपदी भास्कर ऊर्फ राजू धावंजेवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वृत्तपत्राचे प्रबंध संपादक नंदकुमार शहाडे यांनी ही नियुक्ती जाहीर केली.
पत्रकारिता क्षेत्रातील त्यांचा प्रदीर्घ अनुभव, सामाजिक प्रश्नांबाबतची संवेदनशीलता आणि वृत्तसंकलनातील कार्यक्षमतेची दखल घेत त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीची बातमी समोर येताच पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय क्षेत्रातील मान्यवर आणि मित्रपरिवाराकडून शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला आहे.
नवीन जबाबदारी स्वीकारल्यानंतर राजू धावंजेवार लवकरच संपूर्ण विदर्भाचा दौरा करणार असून प्रत्येक जिल्ह्यात सक्षम व कार्यक्षम प्रतिनिधींची नियुक्ती करण्याचा त्यांचा मानस आहे. या माध्यमातून साप्ताहिक स्टिंग ऑपरेशनचे वृत्तजाळे अधिक व्यापक आणि प्रभावी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
विदर्भातील स्थानिक समस्या, विकासाचे प्रश्न, सामाजिक घडामोडी आणि जनहिताशी निगडित विषयांना अधिक प्रभावीपणे न्याय मिळवून देण्यासाठी ही नियुक्ती महत्त्वाची ठरणार असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. राजू धावंजेवार यांच्या या नियुक्तीबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.