सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : तालुक्यातील डोंगरगाव येथील ज्ञानेश्वर तुकाराम कनाके (वय 39) यांचा दारू दुकानाजवळ मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना 30 मे रोजी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. ज्ञानेश्वर हे व्यवसायाने वेल्डिंग कारागीर होते.
माहितीनुसार, ते नेहमीप्रमाणे मार्डीत दारू खरेदीसाठी सरकारी देशी दारू दुकानाजवळ गेले असता परिसरातील निंबाच्या झाडाखाली बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. त्यांना तातडीने मारेगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेची माहिती मृताचे चुलतभाऊ सदानंद कनाके (वय 41, रा. डोंगरगाव) यांनी मारेगाव पोलिसांना दिली. मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार असून, सध्या सुरू असलेल्या तीव्र उष्णतेच्या पार्श्वभूमीवर उष्माघात किंवा अतिमद्यपानामुळे मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, ठाणेदार श्याम वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिगांबर किन्नाके व त्यांचे पथक पुढील तपास करीत आहे.