सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नुकत्याच दिल्ली येथे आयोजित जनजाती सांस्कृतिक कार्यक्रमात आदिवासी समाजाचा उल्लेख "वनवासी" असा केल्याच्या निषेधार्थ आदिवासी सोशल फोरम वणीच्या वतीने राष्ट्रपतींकडे निवेदन सादर करण्यात आले.
उपविभागीय अधिकारी, वणी यांच्या माध्यमातून पाठविण्यात आलेल्या निवेदनात या वक्तव्यामुळे आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याचा आरोप करण्यात आला आहे. आदिवासी समाज हा जल, जंगल आणि जमिनीशी नाळ जुळलेला देशाचा मूळनिवासी समाज असून, "वनवासी" हा शब्द त्यांच्या मूळ ओळखीला कमी लेखणारा आणि ऐतिहासिक अस्तित्वाचा अवमान करणारा असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, आदिवासी समाजाची स्वतंत्र संस्कृती, भाषा, परंपरा आणि गौरवशाली इतिहास आहे. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात तसेच सामाजिक परिवर्तनाच्या चळवळींमध्ये अनेक आदिवासी वीरांनी मोलाचे योगदान दिले आहे. अशा समाजाला "वनवासी" म्हणून संबोधणे हे त्यांच्या सांस्कृतिक अस्मिता व ऐतिहासिक ओळखीला दुय्यम स्थान देण्याचा प्रयत्न असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
आदिवासी सोशल फोरमच्या वतीने केंद्रीय गृहमंत्र्यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध नोंदविण्यात आला असून, संबंधित निवेदन शासन स्तरावर तातडीने पोहोचवून आदिवासी समाजाच्या भावना विचारात घेण्याची मागणी करण्यात आली आहे.
यावेळी उत्तमराव गेडाम, रमेश मडावी, रामदास गेडाम, भाऊराव आत्राम, वसंत चांदेकर, यशवंत जुमनाके, श्रीकृष्ण मडावी, महेश मडावी, अमोल मडावी, महेश आत्राम, दिलीप राजगडकर, कैलास मेश्राम, भगवान आत्राम, किशोर चांदेकर, संदीप बेसरकर, राजेंद्र अरके, जगन्नाथ आत्राम आदींसह समाजातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सर्वांनी निवेदनावर स्वाक्षऱ्या करून आपल्या निषेधाची नोंद केली.