सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर अनधिकृत कपाशी बियाण्यांच्या विक्रीला आळा घालण्यासाठी कृषी विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. मारेगाव तालुक्यातील देवाळा येथे करण्यात आलेल्या संयुक्त धाडीत प्रतिबंधित कपाशी बियाण्यांचा साठा उघडकीस आला असून, संबंधित व्यक्तीविरुद्ध मारेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, देवाळा परिसरात काही दिवसांपासून शासनमान्यता नसलेल्या कपाशी बियाण्यांची विक्री सुरू असल्याची माहिती कृषी विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे कृषी विभागाच्या गुण नियंत्रण पथकाने पोलिसांच्या मदतीने गुरुवारी सायंकाळी कारवाई केली. तपासादरम्यान एका घराजवळ संशयास्पदरीत्या ठेवलेला बियाण्यांचा साठा आढळून आला.
चौकशीदरम्यान सतीश अन्याजी बोंडे (रा. देवाळा) याच्याकडून प्रतिबंधित कपाशी बियाण्यांची पाकिटे जप्त करण्यात आली. पंचनामा करून जप्त करण्यात आलेल्या साठ्यात विविध कंपन्यांच्या एकूण दहा पाकिटांचा समावेश असून त्याची किंमत ९ हजार १० रुपये असल्याचे कृषी विभागाने सांगितले.
विशेष म्हणजे जप्त करण्यात आलेली बियाणे अधिकृत विक्रीस मान्यता नसलेली असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची शक्यता लक्षात घेऊन हा साठा ताब्यात घेण्यात आला. याप्रकरणी संबंधिताविरुद्ध विविध कायदेशीर तरतुदींनुसार गुन्हा नोंदविण्यात आला असून बियाण्यांचा पुरवठा नेमका कुठून होत होता आणि आणखी कोणाचा यात सहभाग आहे का, याचा तपास सुरू आहे.
मारेगावचे पोलीस निरीक्षक शाम वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. कृषी अधिकारी सुरेश बुटले यांनी याबाबत तक्रार दाखल केली असून कृषी विभागाने शेतकऱ्यांना अधिकृत परवानाधारक विक्रेत्यांकडूनच बियाणे खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
शेतकऱ्यांसाठी इशाराअनधिकृत बियाण्यांमुळे उगवण कमी होणे, उत्पादनात घट येणे किंवा पीक नुकसान होण्याचा धोका असतो. त्यामुळे आकर्षक दर किंवा खोट्या हमींना बळी न पडता बियाणे खरेदी करताना पावती व कंपनीची अधिकृत माहिती तपासावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.