सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : तालुक्यातील अनेक मूलभूत प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालले असताना प्रशासन मात्र नेहमीप्रमाणे सुस्तच असल्याचे चित्र दिसून येत आहे. रस्त्यांची दुरवस्था, अवैध वाहतूक, पाणीटंचाई, शासकीय कार्यालयांतील दिरंगाई, नागरिकांच्या तक्रारींकडे होणारे दुर्लक्ष,या सर्व समस्यांमुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. मात्र संबंधित विभागांकडून केवळ आश्वासनांची खैरात केली जात असून प्रत्यक्षात ठोस कार्यवाही होताना दिसत नाही.
विशेष म्हणजे, एखादी घटना घडल्यानंतर काही दिवस प्रशासन सक्रिय झाल्याचे भासवले जाते; परंतु त्यानंतर पुन्हा ‘जैसे थे’ परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे तालुका प्रशासनाला जणू “जीर्ण आजाराची” लागण झाली आहे का? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.
ग्रामीण भागातील रस्ते जड वाहतुकीमुळे अक्षरशः खड्डेमय झाले आहेत. अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. महसूल, पंचायत समिती, सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याने सामान्य माणसाची कामे महिनोनमहिने रखडत आहेत.
लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांनी एकमेकांवर जबाबदारी ढकलण्याऐवजी नागरिकांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. अन्यथा नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास आणखी कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.