सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : तालुक्यातील हिवरा येथे विज कोसळून बैल व गोरू ठार झाल्याची दुर्दैवी घटना दि. 28 मे रोजी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे शेतकरी कुटुंबावर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चोपण येथील शेतकरी मंगल जनार्दन खिरटकर यांनी मक्त्याने केलेल्या बैल व गोरू हिवरा शेत परिसरात निंबाच्या झाडाखाली बांधलेले असताना अचानक वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट सुरू झाला. याचदरम्यान विज थेट कोसळल्याने बैल जागीच ठार झाला, तर दुसरे गोरूही मृत्युमुखी पडले.
या घटनेत एक लाखाच्या जवळपास नुकसान झाल्याचे संबंधित शेतकऱ्याने सांगितले. बैल हा शेतीचा मुख्य आधार असल्याने खिरटकर कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.
दरम्यान, शासनाने योग्यती कार्यवाही करून तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.