बातमी जगत | प्रतिनिधी
मारेगाव : शहरातील आठवडी बाजारात मोबाईल चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून सराईत चोरट्यांनी नागरिकांना अक्षरशः हैराण केले आहे. बाजारात गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी तब्बल सात मोबाईल लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे चोरी गेलेल्या मोबाईलमधील फोनपे आणि बँक खात्यांचा गैरवापर करून एका व्यक्तीच्या खात्यातून तब्बल एक लाख रुपये, तर दुसऱ्या व्यक्तीच्या खात्यातून सात हजार रुपये परस्पर काढण्यात आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गोंडबुरांडा येथील उत्तम पुंडलिक गमे यांचा मोबाईल गत मंगळवारी आठवडी बाजारात चोरीला गेला. चोरट्याने मोबाईलचे लॉक उघडून त्यामधील आधारकार्ड व इतर माहितीच्या आधारे फोनपे खात्यावर डल्ला मारला. संबंधिताच्या खात्यातून ३० हजार, ४० हजार, चार वेळा ५ हजार आणि शेवटी १० हजार रुपये अशा टप्प्याटप्प्याने रक्कम काढण्यात आली. मोबाईलवर व्यवहारांचे संदेश येताच गमे यांनी तातडीने कस्टमर केअरशी संपर्क साधून खाते बंद केले. त्यामुळे खात्यातील उर्वरित अडीच लाख रुपये सुरक्षित राहिले.
याचप्रमाणे कोलगाव येथील सुनील आस्वले यांचाही मोबाईल चोरीला गेला असून त्यांच्या खात्यातून सात हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. या दोन्ही घटनांमुळे आठवडी बाजारात सक्रिय असलेल्या मोबाईल चोरट्यांची दहशत पुन्हा एकदा समोर आली आहे.
दरम्यान, वाढत्या चोरीच्या घटनांमुळे व्यापारी व नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण असून आठवडी बाजार परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवून चोरट्यांवर अंकुश लावण्याची मागणी जोर धरत आहे.