टॉप बातम्या

भर उन्हात बैलांची अमानुष वाहतूक; मारेगाव पोलिसांची धडक कारवाई, तिघे ताब्यात


सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगाव : गोवंशीय जनावरांची निर्दयीपणे वाहतूक करणाऱ्या तस्करांविरोधात मारेगाव पोलिसांनी मोठी कारवाई करत तिघांना ताब्यात घेतले. गौराळा शिवार परिसरात संशयास्पदरीत्या गोवंश वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर रात्री सापळा रचण्यात आला. तपासणीदरम्यान अशोक लेलँड दोस्त (MH 34 BZ 8489) आणि महिंद्रा बोलेरो पिकअप (MH 34 AV 1037) या दोन वाहनांमध्ये चार बैलांना अत्यंत अमानुष अवस्थेत कोंबून नेले जात असल्याचे उघड झाले. या कारवाईत दोन वाहने व चार गोवंशीय बैल असा एकूण 8 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिसांनी वाहनांची पाहणी केली असता बैलांना आखूड दोऱ्यांनी घट्ट बांधून कोणतीही हालचाल करता येणार नाही अशा अवस्थेत ठेवण्यात आले होते. कडक उन्हात वाहनांवर कोणतेही आच्छादन नव्हते, तसेच जनावरांसाठी पाणी किंवा चार्‍याचीही व्यवस्था करण्यात आली नव्हती. 43 ते 44 अंश तापमानात सुरू असलेल्या या वाहतुकीमुळे जनावरांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण झाला होता. याशिवाय चालकांकडे वाहनांची आवश्यक कागदपत्रेही उपलब्ध नसल्याने पोलिसांनी अधिक चौकशी केली.

या प्रकरणी विठ्ठल लक्ष्मण वागदरकर (वय 39) रा. वरोरा जि. चंद्रपूर, रत्नाकर मारोती वाकुळकर (वय 42) रा. टाकळी-डोंगरगाव रेल्वे जि. चंद्रपूर आणि शनिदेवा शिवशंकर पांडे (वय 25) रा. वरोरा जि. चंद्रपूर, या तिघांविरुद्ध प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम 1960 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणेदार शाम वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिगांबर किनाके व पोलीस शिपाई सागर दिपेवार पुढील तपास करीत आहेत. 


Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();