सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : अपघातात मृत पावलेल्या व्यक्तीचा हरवलेला मोबाईल शोधण्यात वणी पोलिसांच्या सायबर सेल आणि 'CEIR' पोर्टल टीमला मोठे यश आले आहे. तांत्रिक कौशल्याचा वापर करून पोलिसांनी हा मोबाईल शोधून काढला आणि आज मृतकाच्या भावाकडे सुपूर्द केला.
मिळालेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी वणी येथील जनता हॉटेलजवळ एक कार अपघात झाला होता. या दुर्दैवी अपघातात भीमनगर, वणी येथील रहिवासी रियाजुद्दीन शेख यांचा मृत्यू झाला होता. अपघात झाला त्या दरम्यान रियाजुद्दीन शेख यांच्या जवळील महागडा मोबाईल घटनास्थळावरून हरवला होता.
याबाबत मृतकाचा भाऊ शाकीर उद्दीन रफी उद्दीन (रा. भीमनगर, वणी) यांनी वणी पोलीस स्टेशन येथे मोबाईल हरविल्याची तक्रार दिली होती. त्यावरून वणी पोलीस स्टेशनमध्ये मोबाईल गहाळ नोंद (मिसिंग) क्र. ६९७/२५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
CEIR पोर्टलच्या मदतीने लागला शोध:
मोबाईलचा शोध घेण्यासाठी वणी पोलीस स्टेशनच्या CEIR (Central Equipment Identity Register) पोर्टल हँडलर महिला पोलीस अंमलदार (LPC) ब.नं. ४९३ छाया उमरे यांनी तात्काळ या हरवलेल्या मोबाईलची माहिती ऑनलाईन पोर्टलवर नोंदवून शोध सुरू केला.
नुकताच हा मोबाईल 'CEIR' पोर्टलवर ऑनलाईन ट्रेस झाला. मोबाईलचा अचूक पत्ता मिळताच पोलिसांनी तो हस्तगत केला. आज दिनांक २५/०५/२०२६ रोजी मा. पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली मृतकाचे भाऊ शाकीर उद्दीन रफी उद्दीन यांना पोलीस स्टेशनमध्ये बोलावून त्यांचा मोबाईल सन्मानाने परत करण्यात आला.
आपल्या मृत भावाची शेवटची आठवण असलेला मोबाईल सुरक्षित मिळाल्यामुळे शाकीर उद्दीन यांनी वणी पोलीस प्रशासन आणि विशेषतः महिला पोलीस अंमलदार छाया उमरे यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.