सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
चंद्रपूर : दिलासाग्राम येथील सीबीएससी कॉन्व्हेंट स्कूलची विद्यार्थिनी अवनी प्राजक्ता उल्हास लालसरे हिने महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या गणित प्रावीण्य परीक्षा २०२५-२६ मध्ये उत्कृष्ट कामगिरी करत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
उच्च दर्जाची तयारी, तर्कशक्ती आणि गणितातील सखोल आकलनाची कसोटी पाहणाऱ्या या कठीण परीक्षेत अवनीने उल्लेखनीय यश मिळवत आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. तिच्या या यशामुळे जिल्ह्यासह संपूर्ण बल्लारपूर शहरात आनंदाचे वातावरण असून विविध स्तरांतून तिचे अभिनंदन होत आहे.
यासोबतच अवनीची यावर्षी जवाहर नवोदय विद्यालयासाठीही निवड झाली असून, तिच्या या दुहेरी यशामुळे कुटुंबियांचा आनंद द्विगुणित झाला आहे. अवनीचे वडील उल्हास लालसरे हे बिल्टमध्ये कार्यरत असून आई प्राजक्ता लालसरे या प्रशासकीय सेवेत कार्यरत आहेत.
अवनीच्या या यशाने केवळ तिच्या कुटुंबाचेच नव्हे, तर शाळा आणि संपूर्ण परिसराचे नाव उज्ज्वल झाले आहे.