सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : मौजा मारेगाव येथील गट क्रमांक २८० मधील गावठाण, भूदान व अनधिकृत ले-आऊट क्षेत्रातील निवासी व व्यावसायिक अतिक्रमण नियमित करण्याच्या मागणीसाठी स्थानिक नागरिक आक्रमक झाले असून प्रशासनाला थेट ८ दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. ठरावीक मुदतीत कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
सुमारे ५० वर्षांपासून या भागात नागरिक वास्तव्यास असून अनेकांनी व्यावसायिक उपक्रमही सुरू केले आहेत. संबंधित अतिक्रमणधारकांनी तहसील कार्यालय मारेगाव, नगर पंचायत मारेगाव तसेच जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ येथे सन २०११ पूर्वीच्या पुराव्यानिशी ऑनलाईन व ऑफलाईन प्रस्ताव सादर केले होते. मात्र, मागील अनेक वर्षांपासून हे प्रस्ताव प्रलंबितच असून प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही, असा आरोप करण्यात आला आहे.
दरम्यान, राज्य शासनाच्या दि. २४ मार्च २०२६ रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीतील निर्णय तसेच महसूल व वन विभागाच्या ताज्या शासन निर्णयानुसार अतिक्रमणधारकांच्या जागा नियमानुकूल करण्याची स्पष्ट तरतूद असूनही स्थानिक प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा संताप नागरिकांनी व्यक्त केला
याबाबत तहसीलदार यांना देण्यात आलेल्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की, येत्या ८ दिवसांत अतिक्रमण नियमितीकरणाबाबत कोणतीही ठोस हालचाल न झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल. तसेच उद्भवणाऱ्या परिस्थितीची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशाराही देण्यात आला आहे.
निवेदन देताना स्थानिक प्रशांत नांदे, अनुप महाकुलकर, मंजुषा बोढाले, शोभाताई नक्षणे, दुष्यंत निकम, अनिकेत चोपणे, मिलिंद राऊत, विराज पोटफोडे, प्रफुल उरकुडे,
फैजान शेख, सलमान शेख, सुनिल परचाके, अविनाश राऊत यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.
