सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : येथील बदकी भवन येथे दिनांक ३ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता मारेगाव तालुक्याची वार्षिक आमसभा उत्साहात पार पडली. या आमसभेला तालुक्यातील विविध विभागांचे अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी, सरपंच, उपसरपंच तसेच नागरिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.
या वार्षिक आमसभेच्या अध्यक्षस्थानी मा. श्री. संजय देरकर (आमदार, वणी विधानसभा क्षेत्र) होते. यावेळी उत्तम निलावाड, तहसीलदार मारेगाव, भिमराव व्हनखंडे, गटविकास अधिकारी पंचायत समिती मारेगाव, अरुणाताई खंडाळकर, माजी महिला व बालकल्याण सभापती जि. प. यवतमाळ, पुरुषोत्तम बुटे, ता.प्रमुख शिवसेना (उबाठा), अविनाश लांबट, अध्यक्ष सरपंच संघटना तथा भाजप मारेगाव तालुका, अध्यक्ष वसंतराव आसुटकर, अध्यक्ष मारेगाव तालुका काँग्रेस कमिटी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या आमसभेत तलाठी, ग्रामविकास अधिकारी तसेच सर्व विभागांचे अधिकारी, मारेगाव तालुक्यातील सर्व सरपंच, उपसरपंच, सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तालुक्यातील खनिज निधी, जलजीवन मिशन, पाणीप्रश्न, रेती उपसा तसेच मागील वर्षीची आमसभा व इतर विविध स्थानिक समस्या यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. उपस्थितांनी मांडलेल्या प्रश्नांची दखल घेत तातडीने उपाययोजना करण्यावर भर देण्यात आला.
मारेगाव तालुक्यातील विविध समस्या व विकासात्मक प्रश्न खुलेपणाने मांडले गेल्याने ही वार्षिक आमसभा प्रभावी व चर्चेने गाजलेली ठरली.