सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : झरीजामणी तालुक्यातील मुकुटबन स्थित RCCPL MP Birla Cement Company मधील कामगारांच्या मागण्यांसाठी चाललेले सात दिवसांचे आंदोलन अखेर यशस्वी ठरले आहे. कॉ. अनिल हेपट यांच्या नेतृत्वाखालील जनरल इंडस्ट्रीज कामगार युनियन (आयटक) यांनी दि.६ नोव्हेंबरपासून सुरू केलेल्या आंदोलनाचा विजय मिळवून काल रात्री संप समाप्तीची घोषणा करण्यात आली.
कामगारांच्या वाढत्या आंदोलनाला आणि जनतेच्या समर्थनाला पाहता असिस्टंट लेबर कमिशनर प्रशांत सिंग यांनी चंद्रपूर येथे कंपनी प्रशासन व युनियन प्रतिनिधींची संयुक्त बैठक बोलावली. चर्चेदरम्यान कमिशनर यांनी कामगारांच्या मागण्या कायदेशीर आणि रास्त असल्याचे स्पष्ट केले व कंपनीच्या आडमुठ्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली.
विशेष म्हणजे, कंपनीने युनियन अनधिकृत असल्याचा दावा केला होता. मात्र, कमिशनरांनी तपासणीदरम्यान स्पष्ट केले की जनरल इंडस्ट्रीज कामगार युनियन ही राज्यमान्य आणि आयटकशी संलग्न नोंदणीकृत युनियन आहे. त्यामुळे कंपनीला युनियनच्या अध्यक्ष कॉ. अनिल हेपट यांच्याशी संवाद साधणे बंधनकारक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या निर्णायक बैठकीस कंपनीच्या व्यवस्थापन प्रतिनिधींनी तसेच युनियनकडून कॉ. अनिल हेपट, अनिल घाटे, पंढरी नांदेकर, प्रफुल्ल बद्रे, रोशन चामाटे, अक्षय पुल्लेवार, महादेव मेश्राम, उमाकांत मोहीतकर, राजू वरहाटे, विश्वनाथ साहू आणि निखील जुमनाके यांनी सहभाग घेतला.
कंपनीने कामगारांच्या सर्व मागण्या मान्य केल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. काल सायंकाळी मुकुटबन शहरात “कामगार एकजुटीचा विजय असो”, “लाल झेंडा जिंदाबाद”, “कॉम्रेड आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं” अशा घोषणांनी वातावरण दणाणून गेले. ढोल-ताशांच्या गजरात कामगारांनी विजयाचा जल्लोष साजरा केला.