सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वणी शहराचे राजकीय वातावरण तापले आहे. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच सर्वच पक्षांचे कार्यकर्ते मैदानात उतरले आहेत. गल्लीबोळ, चौकाचौकात एकच चर्चा सुरू आहे. या वेळी तिकीट कोणाला मिळणार? हाडाच्या कार्यकर्त्याला की लाडाच्या कार्यकर्त्याला?
हाडाचे कार्यकर्ते म्हणजे वर्षानुवर्षे पक्षासाठी निष्ठेने झटणारे, प्रत्येक प्रचार मोहिमेत खांद्याला खांदा लावून काम करणारे लोक. तर लाडाचे कार्यकर्ते म्हणजे नेतृत्वाच्या जवळची “खास मंडळी” जे क्षेत्रात फारसे दिसत नाहीत पण निर्णयाच्या वेळी नेत्यांच्या कानात कुजबुज करणारे. त्यामुळे आता पक्षांतर्गत संघर्ष उफाळून आला आहे. “आम्ही आयुष्यभर पक्षासाठी झटलो, आता आमचाच विचार व्हावा,” अशी हाडाच्या कार्यकर्त्यांची मागणी आहे.
वणी शहरातील निवडणुका परंपरेने चुरशीच्या राहिल्या आहेत. यावेळीही मुख्य सामना महायुती आणि आघाडी यांच्यातच रंगण्याची चिन्हे आहेत. दोन्ही बाजूंना कार्यकर्त्यांचा ओघ मोठा असून, तिकीट वाटपात थोडी चूक झाली तरी नाराजी उसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे नेतृत्वही निर्णय घेताना सावधपणे पावले टाकताना दिसत आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी (अजितदादा गट), वंचित बहुजन आघाडी, भाकपा, प्रहार जनशक्ती पक्ष आणि अपक्ष इच्छुक उमेदवारांनीही तयारी सुरू केली असून काही प्रभागांमध्ये त्रिकोणी, चौरस लढतींचे संकेत मिळत आहेत.
राजकीय हालचालींनी शहरात उत्सुकता निर्माण केली आहे. पोस्टर्स, बैठकांचा धडाका आणि गुप्त चर्चांमुळे निवडणुकीचा रंग चढला आहे.
आता वणीकरांचे लक्ष एका प्रश्नावर खिळले आहे. तिकीट शेवटी मिळणार कोणाला... हाडाच्या कार्यकर्त्याला की लाडाच्या कार्यकर्त्याला?