टॉप बातम्या

वणीमध्ये दोन तडीपार आरोपींना अटक,स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : निवडणूक काळात जिल्ह्यातील तडीपार आरोपींवर नजर ठेवण्याच्या आदेशानंतर यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेने वणी पोलिसांच्या मदतीने विशेष मोहीम राबवली. या मोहिमेदरम्यान वणी शहरातील दोन तडीपार आरोपींना मध्यरात्री अटक करण्यात आली.

गुन्हे शाखेच्या पथकाने ११ नोव्हेंबरच्या रात्री वणी शहरात गस्त घालत असताना दीपक चौपाटी परिसरात संशयास्पद हालचाल करणारा एक तरुण आढळला. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत गोपीकिशन लोणारे (वय ३०, रा. सेवा नगर, वणी) याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने स्वतःची ओळख लपवण्याचा प्रयत्न केल्याने पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला.

दरम्यान, दुसरी कारवाई नेताजी सुभाषचंद्र चौक परिसरात करण्यात आली. येथे देशी दारूच्या भट्टीजवळ संशयास्पदरीत्या फिरत असलेला साहिल कैलास पुरी (वय २२, रा. सेवा नगर, वणी) हा तडीपार आरोपी पोलिसांच्या हाती लागला.

जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी निवडणूक काळात सर्व पोलीस ठाण्यांना तडीपार आरोपींची शोधमोहीम राबविण्याचे आदेश दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेच्या या मोहिमेत वणी पोलिसांनी सक्रिय सहभाग घेतला.

दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध कलम १२२ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेने दिली.



Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();