सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : ग्रामपातळीवरून पंचायत समितीच्या शर्यतीत गंगाधर कवडू ठावरी हे पंचायत समिती मारेगाव निवडणुकीत मार्डी गणातून उमेदवारी लढविण्यास इच्छुक असल्याची चर्चा सध्या जोरात आहे.
ठावरी यांच्या घराण्याची काँग्रेसशी जुनी नाळ असून, त्यांचे वडील आयुष्यभर काँग्रेसशी जोडलेले होते. त्यामुळेच गंगाधर ठावरी यांनाही पक्षाबद्दल आपुलकी निर्माण झाली आणि त्यांनी सन 2000 पासून काँग्रेसमध्ये सक्रिय प्रवेश केला.
2016 मध्ये त्यांनी पिसगाव ग्रामपंचायतीत सदस्य व उपसरपंच म्हणून यशस्वीपणे काम पाहिले. त्याचबरोबर ते कृषी उत्पन्न बाजार समिती मारेगावचे संचालक म्हणूनही कार्यरत राहिले.
पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी त्यांना मार्डी-कुंभा गट प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली होती. या तरुण काळात त्यांनी आंदोलन, मोर्चे, उपोषण आणि विविध जनआंदोलनांमध्ये सक्रिय सहभाग घेतला.
त्यांच्या जनाधार, कार्यतत्परता आणि विकासाभिमुख दृष्टिकोनामुळे गंगाधर ठावरी हे मार्डी गणातील तरुण प्रबळ उमेदवार मानले जात आहेत. शेतकरी, शेतमजूर व सामान्य वर्गातील लोकांमध्ये त्यांची चांगली छबी असून, “आपला माणूस” म्हणून ओळख निर्माण झाली आहे.
मार्डी गणात त्यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा सुरू असून, आता पक्षश्रेष्ठी अंतिम निर्णय काय घेतात याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.