टॉप बातम्या

कोसारा: जखमी कोतवालाची पोलीसात तक्रार, अवैध वाळू तस्करी प्रकरणात आरोपींवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मारेगाव : वर्धा नदी पत्रातील कोसारा रेतीघाटात अवैध वाळू तस्करांनी ट्रॅक्टर चढवून कोतवाल आणि पोलीस पाटील यांना जखमी केल्याच्या घटनेला नवे वळण मिळाले आहे. जखमी कोतवालाने मारेगाव पोलिसात तक्रार नोंदविल्यानंतर आरोपींवर अनेक गंभीर कलमान्वये गुन्हे दाखल झाले आहेत. तथापि, मुख्य आरोपी अद्याप फरार असून त्याच्या शोधासाठी पोलिसांचे पथक सतत प्रयत्न करत आहे.

सोमवारी मध्यरात्री कोसारा परिसरात पाच ते सात ट्रॅक्टरद्वारे अवैध वाळू वाहतूक सुरू असल्याची माहिती तलाठी प्रवीण उपाध्ये यांनी कोतवाल दिलीप पचारे आणि पोलीस पाटील प्रेमदास गाणार यांना दिली. माहिती मिळताच दोघेही घटनास्थळाकडे रवाना झाले. त्यांच्यामागोमाग तलाठींचे पथकही निघाले होते.
पोलीस पाटील व कोतवाल उपचार घेतानाचे क्षणचित्रे


घाटात पोहोचल्यावर तस्करांपैकी एका ट्रॅक्टर चालकाने मुद्दामहून आपले स्वराज कंपनीचे ट्रॅक्टर त्यांच्या दुचाकीवर चढविले, यात कोतवाल आणि पोलीस पाटील दोघेही गंभीर जखमी झाले. या धक्कादायक घटनेमुळे प्रशासनात खळबळ उडाली असून अवैध वाळू तस्करांच्या बेफाम हालचालींना आळा घालण्याचे कठीण आव्हान उभे राहिले आहे.

दरम्यान, कोतवाल पचारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी विरुद्ध कलम 109, 132, 221, 324(1) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, आरोपी आणि ट्रॅक्टर दोन्ही अद्याप सापडले नसल्याने पोलीस पथक आरोपींच्या तपासासाठी विविध ठिकाणी शोध घेत आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();