सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : समाजातील ज्येष्ठ नागरिकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने वणी तालुक्यातील पळासोनी येथील बाजीराव महाराज वृद्धाश्रमात एक आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. या ठिकाणी श्री मारोती गौरकार (काँग्रेस जिल्हा महासचिव यवतमाळ) यांचा वाढदिवस वृद्धाश्रमातील वृद्धांसोबत साजरा करण्यात आला.
या निमित्ताने वृद्धांना ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले तसेच सर्वांसोबत सामूहिक नाश्ता करून आनंदमय वातावरण निर्माण झाले. वाढदिवस साजरा करण्याची ही सामाजिक पद्धत पाहून वृद्धांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद दिसून आला.
कार्यक्रमाच्या वेळी महासचिव मारोती पा गौरकार यांचे जावई अतुल रावजी खापणे, त्यांची कन्या तृष्णा खापणे, तसेच संस्थेचे अध्यक्ष सुहास नांदेकर, उत्तमराव पाचभाई, राजूभाऊ जांभुळकर, सुधाकर धांडे, अमोल धांडे, गौरव गौरकार यांसह वृद्धाश्रमातील सर्व वृद्ध उपस्थित होते.
सामाजिक जाणिवेच्या भावनेतून आयोजित या कार्यक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, वाढदिवस साजरा करण्याचा हा आदर्शपद्धतीचा उपक्रम इतरांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.