सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : शहरातील भिमनगर परिसरातील विजया गार्डनजवळ रविवारी सकाळी एका अज्ञात व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला असून, या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, मृतदेह अनेक दिवसांपूर्वीचा असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. मृतदेह पूर्णतः विघटित अवस्थेत आढळला असून, शरीर आणि शिर वेगळ्या अवस्थेत असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. मृतदेहाजवळ लाकडी दांडा आणि चप्पल आढळून आली, ज्यामुळे संशयाचे वातावरण अधिकच गडद झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच वणी पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा करून तपासाची चक्रे फिरविण्यात आली आहेत. सध्या मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत.
या प्रकरणाचा सखोल तपास वणी पोलीस ठाण्याचे अधिकारी करीत असून, मृत्यूचे नेमके कारण आणि घटनेमागील पार्श्वभूमी प्राथमिक तपासानंतर स्पष्ट होईल.तूर्तास शहरात सतत अशा घटना समोर येत असल्यामुळे नागरिकांतून चिंता व्यक्त केली जात आहे.