सह्याद्री चौफेर | अमोल कुमरे
वणी : होऊ घातलेल्या नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे) पक्षाने वणी शहरात निवडणुकीच्या तयारीला जोरदार सुरुवात केली आहे. शहरात सध्या शिवसेनेचे वातावरण चांगलेच निर्माण झाले असून, कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य आणि उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे.
शिवसेनेचे जिल्हा संघटक विजय चोरडिया यांच्या वतीने वणी नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी इच्छुकांना पक्षाच्या अधिकृत उमेदवारीसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या अर्जामध्ये इच्छुकांनी स्वतःचे वैयक्तिक तपशील, पक्षातील कार्याचा अनुभव, जनसंपर्क आणि समाजकार्याचा अहवाल सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
सोमवार दि.१० नोव्हेंबर रोजी कायर रोड स्थित विनायक मंगल कार्यालयात इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात येणार असून, या मुलाखतींना जिल्हा समन्वयक विश्वास नांदेकर, जिल्हा संघटक विजय चोरडिया आणि शिवसेना नेते विनोद मोहितकर उपस्थित राहणार आहेत. मुलाखती दुपारी ३ ते सायंकाळी ८.३० वाजेपर्यंत पार पडतील.
दरम्यान, शिवसेना (शिंदे गट) मध्ये रोजच नवे कार्यकर्ते आणि पदाधिकारी प्रवेश करत असल्याने पक्षात नवा उत्साह संचारला आहे. पक्षविस्तार आणि संघटन बळकटीसाठी सुरू असलेल्या या प्रवेश मोहिमेमुळे नगरपालिकेच्या इच्छुकांची संख्याही लक्षणीयरीत्या वाढली आहे.
शिव सेनेच्या या जोशपूर्ण तयारीमुळे वणी नगरपालिकेची निवडणूक अधिकच रंगतदार आणि स्पर्धात्मक होणार, अशी चर्चा शहरभर सुरू आहे.