सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : गेल्या तीन वर्षांपासून विविध आरोग्य योजनांचे सर्वेक्षण करूनही मानधन न मिळाल्याने लाल बावटा आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन (सीटू) यांनी यावर्षी १७ नोव्हेंबर ते २ डिसेंबर दरम्यान घेण्यात येणारा कुष्ठरोग सर्वे न करण्याचा निर्णय जाहीर केला. हा निर्णय दिनांक १६ नोव्हेंबर रोजी जिल्हाध्यक्ष कॉ. कुमार मोहरमपुरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा कमिटीच्या बैठकीत घेण्यात आला.
आरोग्य विभागाकडून सर्वेचे आदेश मिळाल्यानंतरही गेल्या तीन वर्षांतील क्षयरोग, हत्तीपाय, पोलिओ, मातृत्व वंदना यांसह अनेक सर्वेंचे मानधन देण्यात आलेले नाही, याबद्दल संघटनेत संताप आहे. ३, १० आणि १४ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी यांना निवेदने देऊन “जुने मानधन मिळाल्याशिवाय नवीन सर्वे नाही” हा भूमीका स्पष्ट केल्याचे जिल्हा सचिव कॉ. उषा मुरखे यांनी सांगितले. परंतु प्रशासनाकडून फक्त तोंडी आश्वासन मिळाल्याने संघटनेने ठाम भूमिका घेतली आहे.
वेतन तीन-तीन महिने थकवणे, पेमेंट स्लिप न देणे यामुळे आर्थिक गैरसमज निर्माण होत असल्याचे आशा वर्करचे म्हणणे आहे. दर महिन्याची पेमेंट स्लिप देणे बंधनकारक करावे, ही मागणीही त्यांनी पुन्हा अधोरेखित केली.
बैठकीत कॉ. प्रीती करमरकर, सुजिता बैस, वंदना बोकसे, अर्चना सावरकर, छाया क्षीरसागर, अर्चना चौधरी, अलका नागपुरे, संगीता डवले, संगीता ढेरे, लीना गांजरे यांसह जिल्हा कमिटी सदस्य उपस्थित होते.