सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : आगामी नगरपरिषद, नगरपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीची धामधूम सुरू असताना वाळू चोरट्यांनी कोसारा घाट परिसरात धाडसी आणि धक्कादायक कृत्य करत प्रशासनालाच लक्ष्य केल्याची गंभीर घटना आज सकाळी घडली.
कोसारा घाटातून अवैधरित्या वाळू तस्करी करण्याचा प्रयत्न काही चोरटे करत होते. ही बाब प्रशासनातील कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच कोतवाल व पोलीस पाटील यांनी तत्काळ धाव घेत कारवाई करण्याचा प्रयत्न केला. मात्र आपला चोरीचा डाव उधळला जाईल या भीतीने चोरट्यांनी प्रशासन कर्मचाऱ्यांवरच ट्रकटर चढवून जीवघेणा प्रयत्न केला.
या हल्ल्यात कोसारा येथील पोलीस पाटील गाणार गंभीर जखमी झाले असून कोतवाल पचारे यांचा हात फ्रॅक्चर झाल्याचे समजते त्यांचेवर वणी येथे उपचार सुरु आहेत. यामध्ये दुचाकी चा दर्शनीभाग चकणाचूर झाला.
या घटनेने मारेगाव तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. कायद्याचे रक्षक असलेल्या ग्रामपातळीवरील कर्मच्याऱ्यांवरच अशी संताजनक हल्लाबोल करण्याचे धाडस वाळू माफियांनी केल्याने प्रशासनही हादरले.
घटनानंतर कोतवाल व पोलीस पाटील आक्रमक झाले असून या अमानुष हल्ल्याचा तीव्र निषेध करत तालुका प्रशासनाला निवेदन देण्याची तयारी त्यांनी सुरू केली आहे. वृत्त लिहे पर्यंत ठाण्यात तक्रार दाखल व्हायची होती.
वाळू तस्करीच्या वाढत्या घटनांमुळे जनतेत अस्वस्थता निर्माण झाली असून,“या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई करणार का?” या प्रश्नाकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.