सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : प्रभाग क्र. 4 मधून सागर मुने हे निवडणूक लढवत असून त्यांच्या उमेदवारीने राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगू लागली आहे. विविध सामाजिक उपक्रमांतून स्थानिकांशी घट्ट नाते जोडलेले असल्याने त्यांच्या उमेदवारी कडे मतदार उत्सुकतेने पाहत आहेत. क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी सक्षम नेतृत्वाची गरज अधोरेखित करत त्यांनी लोकांशी संवाद साधण्यास सुरुवात केली आहे.
हरहुन्नरी नाट्यकलावंत म्हणून सागर मुने यांची ओळख सर्वदूर पसरली आहे. रंगभूमीवरील त्यांच्या प्रभावी भूमिकांनी आणि कलात्मक बहुमुखीतेने त्यांना स्वतंत्र ओळख मिळवून दिली आहे. कलाविश्वातील या अनुभवातून त्यांनी लोकांच्या भावना, प्रश्न आणि अपेक्षा समजून घेण्याचा दृष्टिकोन विकसित केला आहे, जो राजकारणातही त्यांना मोठी ताकद देणार आहे.
अनेक रंगभूमी गाजवल्यानंतर आता नगर परिषदेत त्यांचा आवाज घुमणार असल्याने समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. सांस्कृतिक जाण आणि सामाजिक भान यांचा योग्य संगम साधत त्यांनी जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्यामुळे प्रभाग क्र. 4 मधील निवडणूक आणखी रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत.