सह्याद्री चौफेर | प्रतिनिधी
वणी : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रवास सुलभ करण्यासाठी स्माईल फाउंडेशनने राबवलेल्या “सायकल बँक” उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या उपक्रमांतर्गत वणी परिसरातील गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकलींचे वाटप करण्यात आले. दररोज किलोमीटरचा पायी प्रवास करून शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम अत्यंत दिलासादायक ठरला. “आता शाळा दूर असली तरी आम्हाला भीती नाही; आमच्या सायकली खूप छान आहेत,” अशा उत्साही शब्दांत विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला.
वाटप कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष सागर देविदास जाधव आणि सचिव आदर्श दाते उपस्थित होते. फाउंडेशनने सातत्याने राबवलेले सामाजिक कार्य आणि विद्यार्थ्यांसाठी दाखवलेली संवेदनशीलता याबद्दल उपस्थितांनी कौतुक व्यक्त केले.
स्माईल फाउंडेशन दरवर्षी “सायकल बँक” उपक्रमाअंतर्गत नागरिकांकडून वापरात नसलेल्या सायकली गोळा करून त्या गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवते. या वर्षीही अध्यक्ष सागर जाधव, उपाध्यक्ष पियुष आत्राम, सचिव आदर्श दाते, तसेच विशाल सुंदरणी, उत्कर्ष धांडे, खुशाल मांद्रे, कुणाल आत्राम, रोहन कोरपेनवार, सचिन जाधव, तन्मय कापसे, अनिकेत वासरीकर, कार्तिक पिदुरकर, जगदीश गिरी, शुभम भेले, भूषण पारेवे, सिद्धार्थ साठे आदी कार्यकर्त्यांनी मेहनत घेऊन हा उपक्रम यशस्वी केला.
फाउंडेशनने नागरिकांना आवाहन केले आहे की, वापरात नसलेली सायकल घरातच पडून राहू देऊ नका; ती एखाद्या विद्यार्थ्याच्या आयुष्यातील ‘टर्निंग पॉईंट’ ठरू शकते. दान करण्यासाठी 7038204209 या क्रमांकावर संपर्क साधावा. फाउंडेशनची टीम सायकल घरपोच गोळा करेल. तसेच ज्यांना आर्थिक मदत करायची आहे, त्यांनीही पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.
“एक सायकल म्हणजे केवळ वाहन नाही; ती शिक्षणाकडे नेणारी पहिली पायरी आहे. तुमची छोटी मदत एखाद्या विद्यार्थ्याचे भविष्य बदलू शकते.”-सागर जाधव, अध्यक्ष, स्माईल फाउंडेशन