सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : वनोजा देवी आणि परिसरातील दीर्घकालीन समस्या सोडवण्यासाठी उपसरपंच प्रशांतकुमार भंडारी यांनी देवी चौफुलीवर उपोषण सुरू करून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. तीन दिवस चाललेल्या या उपोषणानंतर अखेर प्रशासनाने लेखी आश्वासन देत शरबत पाजून उपोषण संपवले. मात्र, उपोषण संपल्यानंतरही स्थानिकांच्या समस्या पूर्ववत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
ग्रामीण भागात अवैध दारू विक्री, जड वाहनांची वाहतूक, रस्त्यांची बिकट अवस्था, तसेच स्वच्छतेचा अभाव या समस्या आजही कायम आहेत. उपोषणादरम्यान प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले होते, पण प्रत्यक्षात काहीच बदल झालेला नाही. “उपोषण करून काय उपयोग झाला?” असा प्रश्न आता नागरिकांच्या चर्चेचा विषय ठरला आहे.
दरम्यान, स्थानिक नागरिकांनी समाजमाध्यमांवर आपली नाराजी व्यक्त करत “प्रशासनाने दिलेली आश्वासने ही फक्त कागदावरच राहिली” अशी टीका केली आहे. या संपूर्ण घटनेमुळे ग्रामीण भागात प्रशासनाविषयी असंतोष वाढताना दिसत आहे. वनोजा देवी परिसरातील समस्या कायम राहिल्यास पुन्हा मोठे जन आंदोलन छेडावं लागेल असा सूर उमटत आहे.