सह्याद्री चौफेर | अमोल कुमरे
वणी : दिनांक ११ नोव्हेंबर २०२५ रोजी (मंगळवार) आंबेडकरी जन आंदोलन वणी विधानसभा तर्फे प्रकल्पग्रस्त गावांतील नागरी समस्या आणि शेतमजूर वर्गातील अडचणींविषयीचे निवेदन क्षेत्रीय प्रबंधक वेकोली यांना उपक्षेत्रीय प्रबंधक मुंगोली खाण यांच्या माध्यमातून देण्यात आले.
निवेदनात नमूद करण्यात आले की, वेकोली उद्योगामुळे प्रकल्पग्रस्त गावांतील शेतमजूर, अल्पभूधारक, आदिवासी, दलित, ओबीसी वर्गातील नागरिकांना रोजगाराच्या संधींपासून वंचित ठेवून त्यांना बेरोजगारीच्या खाईत लोटले जात आहे. या अन्यायाविरुद्ध वेकोली प्रशासनाने तातडीने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी मागणी करण्यात आली.
उपक्षेत्रीय प्रबंधक मुंगोली खाण यांच्याशी चर्चेदरम्यान पुढील प्रमुख मागण्या करण्यात आल्या —•वेकोली अंतर्गत थर्ड पार्टी करारांमधून निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या खुल्या जाहिराती प्रकल्पग्रस्त गावांत लावाव्यात.•भूमिहीन व अल्पभूधारक शेतकऱ्यांना रोजगारात प्रथम प्राधान्य द्यावे.•प्रकल्पग्रस्त गावातील शेतमजूरांना प्रकल्पग्रस्त असल्याचे प्रमाणपत्र देण्यात यावे.•अस्थायी रोजगारात आदिवासी, दलित, बौद्ध, भटके विमुक्त व अल्पसंख्याक यांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात संधी मिळावी.•पैनगंगा नदी पुलापासून कोलगावपर्यंत पक्का रस्ता तयार करण्यात यावा.•हलकी वाहने व दुचाकींसाठी पर्यायी मार्गाची सोय करण्यात यावी.
या सर्व मागण्या तातडीने मान्य न झाल्यास आंबेडकरी जन आंदोलनच्या माध्यमातून वेकोली प्रशासनाविरोधात तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला.
निवेदन सादर करताना अनिल तेलंग (मुख्य संयोजक, ग्रामपंचायत सदस्य येनक), गणपतभाऊ टेकाम (माजी उपसरपंच, येनक), यशवंतराव पाटील (माजी सरपंच, कोलगाव), दिलीप तुमराम (टाकळी), निकेश आत्राम, पिंटू सोयाम आणि रुपेश आत्राम (चिखली) उपस्थित होते.