टॉप बातम्या

मारेगावात अंगणवाडी भरतीसाठी प्रथमच कोलामी बोलीत मुलाखती; कोलाम समाजात समाधानाचा माहोल

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मारेगाव : कोलाम समाजाची बोलीभाषा असलेल्या कोलामी भाषेला शासन-प्रशासनात आजवर फारसे स्थान मिळाले नव्हते. या भाषेची दखल न घेतल्यामुळे समाजाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. मात्र यंदा मारेगाव येथे झालेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीस पदांच्या भरतीत मुलाखती थेट कोलामी भाषेत घेण्यात आल्याने कोलाम समाजात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाच्या या पावलाने आदिवासी भाषेला मिळालेला मान ऐतिहासिक ठरत असल्याचे मत व्यक्त होत आहे.

30 सप्टेंबर रोजी बालविकास प्रकल्प कार्यालय, मारेगाव येथे झालेल्या मुलाखतीत तालुक्यातील पेंढरी, खंडणी (गावपोड), म्हैसदोडका (गावपोड), हिवरी (गावपोड) येथील रिक्त पदांसाठी उमेदवारांची निवड करण्यात आली. शासनाने विशेष नियमांनुसार, ज्या वस्तीत किंवा तांड्यात 50 टक्क्यांपेक्षा अधिक मुले एकाच जमातीची असतील, त्या भाषेत पारंगत उमेदवारालाच प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मुलांशी त्यांच्या मातृभाषेत संवाद साधणे सुलभ होणार असून त्यांच्या शिक्षणात मोठी प्रगती अपेक्षित आहे.

या मुलाखतीसाठी कोलामी बोलीचे तज्ञ म्हणून तालुक्यातील शिक्षक पैकुजी आत्राम, वासुदेव टेकाम आणि सुरेश आत्राम यांची नेमणूक करण्यात आली होती. भरती प्रक्रियेत 15 अंगणवाडी सेविका व 15 मदतनीस उमेदवार सहभागी झाले होते. बोलीभाषेला मिळालेल्या या प्रोत्साहनामुळे आदिवासी समाजात शैक्षणिक दर्जा उंचावण्याबाबत नवा विश्वास जागृत झाला आहे.


Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();