सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : अवकाळी पावसाने उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या अडचणींना न्याय मिळावा, यासाठी मारेगाव तालुका काँग्रेसने पुढाकार घेत प्रशासनाला निवेदन सादर केले. या निवेदनाद्वारे शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, पीकविमा नुकसानभरपाई आणि विशेष मदत पॅकेज जाहीर करण्याची मागणी करण्यात आली.
गेल्या काही आठवड्यांतील मुसळधार पावसामुळे सोयाबीन, कपाशी यांसारख्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांची पिके पूर्णपणे नष्ट झाली असून कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर मायबाप सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा हात देऊन दिलासा द्यावा, अशी मागणी काँग्रेसने केली.
यावेळी ज्येष्ठ नेते नरेंद्र ठाकरे, माजी सभापती अरुणाताई खंडाळकर, तालुका अध्यक्ष मारोती गौरकार, सभापती गौरीशंकर खुराणा, संचालक वसंतराव आसूटकर, रविंद्र धानोरकर, अंकुश माफूर यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
काँग्रेसने या निवेदनाद्वारे शेतकऱ्यांच्या वेदना आणि प्रशासनाच्या जबाबदारीचा मुद्दा अधोरेखित करत शासनाने तात्काळ निर्णय घेण्याचे आवाहन केले.