टॉप बातम्या

श्री रंगनाथ स्वामी पतसंस्थेचा भव्य सभासद मेळावा उत्साहात

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ च्या निमित्ताने श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्था, वणी यांच्या वतीने भव्य ‘सभासद मेळावा’ भद्रावती येथील स्वागत सेलिब्रेशन हॉलमध्ये उत्साहात पार पडला. सभासदांशी थेट संवाद साधत सहकार चळवळीचे महत्त्व अधोरेखित करणे आणि संस्थेच्या कार्याचा आढावा घेणे हा या मेळाव्याचा प्रमुख हेतू होता. सभासदांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे कार्यक्रमाला उत्साही आणि प्रेरणादायी वातावरण लाभले.

मेळाव्याचे उद्घाटन जिल्हा उपनिबंधक जे.के. ठाकूर यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक निबंधक गणेश काळे, सुनील पांडे, भवरकर आणि सचिन गौरखेडे हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे अध्यक्ष अॅड. देविदास काळे यांनी भूषवले. उपाध्यक्ष विवेकानंद मांडवकर यांनी संस्थेच्या प्रवासाचा आणि भविष्यातील वाटचालीचा आढावा घेत प्रस्ताविक भाषण केले. या प्रसंगी यवतमाळ जिल्हा सहकारी बोर्डाचे तज्ञ संचालक प्रा. कवडूजी नगराळे यांनी “सहकारातून समृद्धी” या विषयावर प्रेरणादायी मार्गदर्शन करत सहकाराचे सामाजिक व आर्थिक योगदान अधोरेखित केले.

कार्यक्रमात संस्थेच्या कार्यात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ठेवीदार, प्रामाणिक कर्जदार, मेहनती अभिकर्ते आणि शाखा व्यवस्थापकांचा सत्कार करण्यात आला. या सन्मान सोहळ्यामुळे संस्थेच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले. मान्यवरांनी आपल्या भाषणातून “सभासदांचा विश्वास हेच संस्थेचे खरे भांडवल आहे,” असे सांगत संस्थेच्या प्रगतीची दिशा सभासदांमुळेच शक्य झाल्याचे नमूद केले.

अध्यक्षीय भाषणात अॅड. देविदास काळे यांनी संस्थेचा आर्थिक तसेच सामाजिक प्रवास सांगत, “सहकाराच्या माध्यमातून समाजातील सर्व घटकांची प्रगती साधणे हेच आमचे ध्येय आहे,” असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन ढोके यांनी केले, तर संचालक सुरेश बरडे यांनी आभार प्रदर्शन केले. मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दोरखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली शाखा व्यवस्थापक प्रज्ञा टोंगे, कर्मचारीवर्ग, अभिकर्ते व संचालक मंडळाने यशस्वी आयोजन केले. कार्यक्रमास प्रा. कवडूजी नगराळे, अॅड. घनश्याम निखाडे, डॉ. भूपाळराव पिंपळशेंडे, चिंतामण आगलावे, अरविंद ठाकरे, छायाताई ठाकूरवार, नीलेश गुंडावार, सूरज गावंडे आदी मान्यवर उपस्थित होते.


Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();