टॉप बातम्या

चंद्रपूरमध्ये यंदा रावण दहन रद्द – नागरिकांत नाराजी, पण निर्णयाचे कौतुकही


सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

चंद्रपूर : दरवर्षी महाकाली मंदिर परिसरात उत्साहात पार पडणाऱ्या रावण दहनाची प्रतीक्षा यंदा नागरिकांना फोल ठरली. विजयादशमीच्या दिवशी म्हणजेच २ ऑक्टोबर रोजी हजारो लोक कार्यक्रम पाहण्यासाठी महाकाली मंदिर परिसरात जमले, मात्र रावण दहन होणारच नाही हे समजल्यावर अनेकांच्या चेहऱ्यावर निराशा उमटली. "कार्यक्रम रद्द होण्यामागे महाकाली महोत्सवाच्या पंडालमुळे अडथळा आला का?" अशी कुजबुज नागरिकांमध्ये सुरू झाली होती. सोशल मीडियावरही याबाबत चर्चांना उधाण आले होते.

या संदर्भात सार्वजनिक दसरा महोत्सव मंडळाने स्पष्टीकरण देत सांगितले की, यंदा राज्यभर पडलेल्या अतिवृष्टीमुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून शेतकरी तसेच नागरिक मोठ्या संकटात सापडले आहेत. अशा पार्श्वभूमीवर महाकाली मैदानात होणारा दसरा महोत्सव व रावण दहन कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. आयोजकांनी याबाबत शहरात बॅनर लावून माहिती दिली होती.

नागरिकांना कार्यक्रम न झाल्याची खंत जाणवत होती, पण पूरग्रस्त व शेतकऱ्यांच्या दुःखाशी एकरूप होत उत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल अनेकांनी आयोजक मंडळाचे कौतुक केले. "समाजाच्या पाठीशी उभे राहणे हा खरा सण आहे," अशी प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली.

Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();