सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : तालुक्यात गुरुवारी रात्री झालेल्या एका भीषण अपघातात दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात वणी–कायर–मुकुटबन मार्गावरील उमरी गावाजवळ सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास घडला.
मुकुटबन येथे काम आटोपून दुचाकीवरून वणीकडे परतत असताना सचिन प्रकाश येल्लारवार (२५, रा. गायकवाड लेआऊट, नांदेपेरा रोड, वणी) आणि संदीप विजय चामूलवार (३८, रा. रंगारीपुरा, वणी) या दोघांचा अपघातात मृत्यू झाला. गेल्या तीन दिवसांपासून रस्त्याच्या कडेला निष्काळजीपणे उभा ठेवलेला डोलोमाईट दगडांनी भरलेला ट्रक (क्र. MH34 BG8962) त्यांच्या दुचाकीला समोर आला. वेगात झालेल्या धडकेत दोघांना गंभीर दुखापत झाली आणि त्यांनी जागीच प्राण सोडले.
अपघाताची माहिती मिळताच वणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहांचा पंचनामा करून त्यांना वणी ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले असून ट्रक जप्त करून पोलीस ठाण्यात आणण्यात आला आहे. बातमी लिहेपर्यंत शवविच्छेदनाची प्रक्रिया सुरू होती.