सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : दिवाळी अगदी दारात आली आहे आणि शहरातील बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. दीपोत्सवासाठी लागणारे साहित्य मोठ्या प्रमाणावर दाखल झाले असून विशेषतः मुंबई आणि नागपूर येथून आलेले आकर्षक आकाशदिवे ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत.
पूर्वी साध्या रंगीत कापडापासून आकाशदिवे तयार होत असत, पण आता त्यात आधुनिकतेची जोड मिळाली आहे. बांबू, रंगीत कागद, वेलवेट, कृत्रिम फुले आणि कलाकुसर वापरून बनविलेले हे आकाशदिवे बाजारात १५० रुपयांपासून ते हजार रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. मात्र, यंदा किमतींमध्ये सुमारे १० टक्क्यांची वाढ झाल्याने ग्राहकांना दरवाढीचा थोडा फटका बसत आहे.
यावर्षी लक्ष्मीपूजनासाठी खास तोरणे आणि कृत्रिम रांगोळ्यांचीही मोठी मागणी आहे. विविध रंग, कापड आणि प्लास्टिकपासून तयार झालेली तोरणे बाजारात आकर्षणाचे केंद्र बनली आहेत. वेळेअभावी अनेकजण तयार रांगोळ्या खरेदी करत असून, दुकाने ग्राहकांच्या गर्दीने फुलली आहेत.
एकूणच, वणीची बाजारपेठ सध्या दिवाळीच्या झगमगाटाने उजळली असून, सर्वत्र प्रकाश, रंग आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यंदा वणीच्या बाजारात दिवाळीचा उत्साह मागील वर्षीप्रमाणे नाही. मात्र,मुंबई आणि नागपूरहून आलेल्या नावीन्यपूर्ण आकाशदिव्यांच्या खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत आहे.— रोहन उलमाले, वणी
