सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, तालुका शाखा वणी यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश मिळाले असून वणी नगराध्यक्ष पद आदिवासी समाजातील महिलांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. 2016 पासून या मागणीसाठी परिषदेनं सातत्याने प्रयत्न केले होते आणि अखेर त्या प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.
या ऐतिहासिक निर्णयामुळे आदिवासी समाजात उत्साहाचे व सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. परिषदेनं अनेक स्तरांवर पाठपुरावा करत हा विषय शासन दरबारी प्रभावीपणे मांडला होता. यामध्ये सौ. पुष्पाताई पुंडलिक आत्राम यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील प्रयत्नांना आता यश मिळाल्याने संपूर्ण आदिवासी समाजाकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.
सौ. आत्राम यांच्या पाठीशी वणी तालुका शाखेची संपूर्ण टीम खंबीरपणे उभी असून, स्थानिक आदिवासी महिला देखील त्यांना पूर्ण पाठिंबा देण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.
हा निर्णय केवळ स्थानिक राजकारणातील समीकरणे बदलणारा ठरणार नाही, तर आदिवासी महिलांसाठी नेतृत्वाची मोठी संधी घेऊन येणारा ठरेल, असे मत सामाजिक क्षेत्रात व्यक्त केले जात आहे.