सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलगा, बालपणापासून अंधत्वाशी झुंज देत शिक्षणाची वाट चालत राहिला — ही प्रेरणादायी कहाणी आहे मारेगाव तालुक्यातील मार्डी येथील पवन मोरेश्वर आखाडे याची. वडील शेतीत कष्ट करत, तर आई रोजंदारीवर काम करून संसाराचा गाडा ओढत होती. अशा प्रतिकूल परिस्थितीत दोन्ही डोळ्यांनी अंध असलेल्या पवनच्या पालकांनी हार न मानता त्याला शिक्षणाची वाट दाखविली. पवननेही जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर शिक्षणात प्रगती करत कुटुंबाचा अभिमान बनला.
बालपणापासूनच अंधत्वाशी झुंज देत पवनने ब्रेल लिपीतून शिक्षण घेतले आणि वरोरा येथील संध्या निकेतन अपंग विद्यालयातून बारावी परीक्षेत ८३ टक्के गुण मिळवले. पुढे नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली. त्याच्या गुणांना ओळखून ‘हेल्प फाउंडेशन’ने शिष्यवृत्ती दिली आणि त्यानंतर बेंगळुरू येथील TCC व EMET स्किल डेव्हलपमेंट इंटरशिपसाठी त्याची निवड झाली. सध्या पवन नाशिक येथील ब्लाईंड फाउंडेशन ऑर्गनायझेशनमध्ये ट्रेनर म्हणून कार्यरत असून, पदवीधर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत आहे.
अंधत्वावर मात करून आयुष्य उजळविणाऱ्या पवनची कहाणी आजच्या तरुणाईसाठी प्रेरणादायी ठरते. अनेकांकडे सर्व सुविधा असूनही शिक्षणात दुर्लक्ष केले जाते, तर पवनने अंधत्व आणि गरिबी या दोन्हीवर मात करून आपल्या कर्तृत्वाने उदाहरण घालून दिले. पवनच्या जिद्दीला आणि चिकाटीला सलाम.