सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : तालुक्यातील वनोजा (देवी) गावातील पंचशील चौकात मजुरीच्या पैशाच्या वादातून एका तरुणावर कडेने हल्ला करून जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी दोन भावांविरुद्ध मारेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी अभिजीत दिनेश नगराळे (वय 20, रा. वनोजा-देवी) हा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षण घेत असताना मारेगाव येथील एका कॅटरिंगमध्ये काम करतो. कामाच्या मजुरीवरून त्याचा साहील सुखदेव काळे याच्याशी वाद झाला होता. याच रागातून 3 ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास पंचशील चौकात साहील काळे याने अभिजीतवर हातातील कडेने वार करत डोक्यात जखम केली.
यानंतर रात्री अभिजीत घरी परतल्यावर साहीलचा भाऊ राकेश काळे (वय 27) हा त्याच्या घराच्या अंगणात येऊन अभिजीत व त्याच्या वडिलांना मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. गावकऱ्यांच्या हस्तक्षेपाने वाद शांत झाला. त्यानंतर अभिजीत नगराळे याने पोलिसात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी साहील काळे (21) आणि राकेश काळे (27) या दोघांविरुद्ध भा.दं.वि. कलम 118(1), 351(2)(3), 352 नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास मारेगाव पोलीस करत आहेत.