सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : मुकुटबन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दहेगाव येथे आज सकाळी शेतात ८ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या कामगाराचा मृतदेह आढळल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे.
मृताचे नाव देवेंद्र विठ्ठल पेदाम (वय ४०, रा. गायडोंगरी, ता. सावली, जि. चंद्रपूर) असे असून, तो दहेगाव येथील शेतमालक प्रवीण नगराळे यांच्या शेतात मजूर म्हणून कार्यरत होता. तो ११ ऑक्टोबरपासून बेपत्ता होता.
आज सकाळी ११ वाजता शेतातील कपाशीच्या झाडांमध्ये मृतदेह आढळून आला. ग्रामस्थांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर पो.नि. विलास कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय प्रवीण हिरे यांनी पंचनामा केला.
प्राथमिक तपासात मृत्यूचे कारण स्पष्ट झालेले नाही. शवविच्छेदन अहवालानंतरच नेमके कारण समजू शकेल, अशी माहिती पोलिसांनी दिली. या घटनेमुळे गायडोंगरी परिसरात शोककळा पसरली असून पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.