टॉप बातम्या

“माझा एकही कार्यकर्ता जेलमध्ये गेला नाही, गेला तर मी सोबत राहिलो” — माजी आमदार विश्वास नांदेकर

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : शहराच्या राजकारणात मोठा भूकंप घडवणाऱ्या घटनेत प्रसिद्ध दानशूर व्यक्तिमत्व विजयबाबू चोरडिया, युवा उद्योजक आशिष काळे आणि तरुण कार्यकर्ते राहुल मुंजेकर यांनी शिवसेना मुख्यनेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत मुंबई येथे शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. या प्रवेशानंतर वणी शहरात त्यांचे जंगी आणि उत्साहात स्वागत करण्यात आले. त्यानंतर येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत माजी आमदार विश्वास नांदेकर यांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडली.

या पत्रकार परिषदेत बोलताना विश्वास नांदेकर यांनी विजय बाबुंचं यांच्या प्रवेशावर भरभरून कौतुक केले. अनेक गोष्टींना उजाळा देत ते पुढे म्हणाले, “मी संघटनेला आई मानतो. संघटनेला पडताळणीची गरज नाही. जे सांगितलं ते केलंच पाहिजे, झालं ते झालंच पाहिजे, हीच माझी भूमिका आहे. माझा एकही कार्यकर्ता आजपर्यंत जेलमध्ये गेला नाही, आणि गेला तर मी त्याच्यासोबतच शेवट पर्यंत राहिलो.” त्यांच्या या वक्तव्याने उपस्थितांमध्ये एकच उत्साह संचारला होता.

विजय चोरडिया यांनीही पत्रकार परिषदेत भाजपावर थेट टीका केली. ते म्हणाले, “पक्षात असताना मला सतत डावलले गेले, माझ्या कामात अडथळे आणले गेले. माझं काम पारदर्शक असतानाही मला दाबण्याचा प्रयत्न झाला. भ्रष्टाचार करणारे लोक मात्र वरचढ ठरत होते.” या परिस्थितीमुळेच त्यांनी भाजपाला सोडचिट्टी देत शिव सेनेत प्रवेश केल्याचे स्पष्ट केले. शिव सेनेचे संघटन वणी विधानसभा क्षेत्रात अधिक बळकट होणार असल्याचा विश्वास चोरडिया यांनी यावेळी व्यक्त केला.

पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी सांगितले की, “माझा मुलगा कुणाल आजही भाजपात आहे. माझ्या या निर्णयामुळे त्याच्या राजकीय वाटचालीवर काहीही परिणाम होणार नाही.” या घडामोडीनंतर वणी शहरातील राजकीय समीकरणांमध्ये नव्या चर्चांना सुरुवात झाली असून, स्थानिक स्तरावर शिंदे सेनेला यामुळे नवसंजीवनी मिळाल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();