सह्याद्री चौफेर | वणी प्रतिनिधी
वणी : शहरात कर्कश आवाज करत बुलेट चालवणाऱ्या काही वाहनचालकांवर वाहतूक नियंत्रण शाखेने धडक कार्यवाही केली आहे.
वाहतूक शाखेच्या पथकाने या बुलेट चालकांची वाहने थांबवून त्यातील कर्कश आवाज करणारे सायलेन्सर काढून जप्त केले. नियमाप्रमाणे मूळ कंपनीचे सायलेन्सर बसवल्यानंतरच संबंधित वाहनचालकांना दंडाची रक्कम भरून बुलेट वाहने परत देण्यात आली.
शहरात वाढत्या ध्वनीप्रदूषणाला आळा घालण्यासाठी ही कारवाई करण्यात आली असून अशा प्रकारे कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर पुढेही कठोर पावले उचलली जाणार असल्याचा इशारा वाहतूक नियंत्रण शाखेने दिला आहे.
बुलेट वापरणाऱ्या चालकांनी मूळ कंपनीचे सायलेन्सरच वापरावेत आणि मोटार वाहन कायद्याचे पालन करावे, असे आवाहन वाहतूक नियंत्रण शाखा वणी तर्फे करण्यात आले आहे.