सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : शहरालगत खंडर अवस्थेत असलेल्या जीएस ऑइल मिल येथील खुल्या मैदानातील पाण्याच्या टाक्यात नवीन वागदरा येथील मनोज गंगाधर वानखेडे (वय ३५) याचा मृतदेह आढळल्याने वणी शहरात एकच खळबळ उडाली होती. घटनेनंतर वणी पोलिसांनी तपास जलद गतीने करत अल्पावधीतच या रहस्यमय घटनेचा उलगडा केला. या प्रकरणात मनोजच्या पत्नीचे अनैतिक संबंध असलेला वाजीद हुसेन (वय ३९, रा. मोमीनपुरा) व त्याचा साथीदार शुभम कशेट्टीवार यांना पोलिसांनी अटक केली असून अन्य काही साथीदार फरार आहेत.
मनोज वानखेडे हे पेंटिंग चे काम करून परिवाराचा गाडा हाकलायचा. काही महिन्यांपूर्वी त्याला पत्नीच्या अनैतिक संबंधांची शंका आली होती. पत्नीला समजावून सांगत त्याने तिचे वाजीदशी संपर्क तोडण्यास भाग पाडले. यानंतर वाजीद संतापला आणि पत्नीला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने मनोजच्या पत्नीने पोलिसात तक्रार दाखल केली आणि वाजीदला तुरुंगात पाठविण्यात आले. पण मनोजमुळेच आपले संबंध तुटल्याची खंत वाजीदच्या मनात होती. या रागातूनच त्याने मनोजचा काटा काढण्याची भीषण योजना आखली.
१४ ऑक्टोबरच्या रात्री वाजीदने मनोजला साईनगर परिसरात दारू पिण्यासाठी बोलावले. दोघांमध्ये बोलणे सुरू असतानाच वाजीद आणि त्याच्या साथीदारांनी अचानक हल्ला चढवला. मनोजच्या डोक्यात लोखंडी रॉडने प्रहार करून त्याच्यावर चाकूने सपासप वार केले. मनोज जागीच मरण पावला. त्यानंतर वाजीदने मृतदेह कारमध्ये टाकून जीएस ऑइल मिलच्या आवारात असलेल्या टाक्यात फेकून दिला आणि घटनास्थळावरून पसार झाला.
१५ ऑक्टोबरला दुपारी टाक्यात मृतदेह आढळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवे, प्रभारी ठाणेदार शाम वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय प्रियंका चौधरी व सहकाऱ्यांनी कसून तपास सुरू केला. मनोजच्या पत्नीचा जबाब नोंदवून संशयितांना शोधण्यात आला. चौकशीत वाजीदने गुन्ह्याची कबुली दिली. दोघांना अटक करण्यात आली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. वणी पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे या खळबळजनक खुनाचा पर्दाफाश होताच परिसरात पोलीस यंत्रणेच्या कार्याचे कौतुक होत आहे.