सह्याद्री चौफेर | अमोल कुमरे
वणी : शहरात पहिल्यांदाच नगराध्यक्ष पद अनुसूचित जमाती (ST) महिलांसाठी आरक्षित करण्यात आले असून, ही बाब शहराच्या राजकीय व सामाजिक इतिहासात एक मोठी पायरी मानली जात आहे. यामुळे अनेक नवोदित व कार्यक्षम महिला नेतृत्वाला पुढे येण्याची संधी उपलब्ध झाली आहे. ‘राखीव मुळे हिरमोड झाली’ अशी टीका अनेकदा ऐकू येत असली, तरी यावेळी याच राखीव व्यवस्थेमुळे वणी शहरातील अनुसूचित जमातीच्या महिलांना मुख्य राजकीय जबाबदारी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या आरक्षणामुळे वणी नगरपरिषदेच्या कारभारात सामाजिक समावेश वाढेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. अनुसूचित जमातीतील महिलांना आजवर अशा पातळीवर नेतृत्वाची संधी कमी प्रमाणात मिळाली होती. मात्र आता त्यांना शहर विकासाच्या निर्णयप्रक्रियेत भाग घेता येणार असून, स्थानिक प्रश्न, मूलभूत सुविधांची सुधारणा आणि समाजहिताचे निर्णय थेट घेता येणार आहेत. ही संधी म्हणजे केवळ सत्तेत येण्याचे माध्यम नसून, महिलांच्या नेतृत्व क्षमतेचा समाजाला नव्याने परिचय देण्याची संधी आहे.
वणी नगरपरिषद हद्दीत विविध वॉर्डांमध्ये अनेक समस्या असून, पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, कचरा व्यवस्थापन, आरोग्य सुविधा यावर अधिक प्रभावी काम करणे अपेक्षित आहे. नवीन नगराध्यक्ष अनुसूचित जमातीमधून महिला असल्यामुळे वंचित व दुर्लक्षित घटकांच्या प्रश्नांना प्राधान्य मिळेल, अशी अपेक्षा आहे. ही निवड केवळ सामाजिक न्यायाचे प्रतीक ठरणार नाही, तर वणीच्या सर्वांगीण विकासासाठी महिलांचे नेतृत्व प्रभावी ठरू शकते, असे स्थानिक नागरिकांकडून बोलले जात आहे.