सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : वणी उपविभागातील मुकुटबन येथे सुरू असलेल्या आरसीसीपीएल सिमेंट कंपनीविरोधातील आंदोलनाला शुक्रवारी अनपेक्षित वळण मिळाले. शिवसेनेच्या नेतृत्वाखालील शेकडो नागरिकांनी कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत घुसून आक्रमक पवित्रा घेतल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
चार दिवसांपासून सुरू असलेले ठिय्या आंदोलन कंपनी व्यवस्थापनाकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने उग्र होत असल्याचे स्पष्ट दिसून आले. स्थानिकांसाठी रोजगार, योग्य मोबदला, पर्यावरण संरक्षण व सुविधा या मागण्यांकडे कंपनी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.
महिला, युवक व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून घोषणाबाजी करत आंदोलन अधिक तीव्र केले. जिल्हाध्यक्ष संजय निखाडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलकांनी “मागण्या मान्य झाल्याशिवाय माघार नाही” असा निर्धार व्यक्त केला. यादरम्यान पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवून आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला.
परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून मुकुटबनसह शिरपूर, वणी, मारेगाव, पाटण व यवतमाळ येथून अतिरिक्त पोलीस फौज बोलावण्यात आली. घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांकडून सविस्तर अहवाल मागवला.
दुपारी आमदार संजय देरकर आंदोलनस्थळी दाखल झाले. त्यांनी आंदोलकांशी संवाद साधून कंपनी व्यवस्थापनासोबत रात्री उशिरा बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले असले तरी मागण्या पूर्ण न झाल्यास संघर्ष अधिक उग्र करण्याचा इशारा देण्यात आला.
या आंदोलनात आमदार संजय देरकर, जिल्हाध्यक्ष संजय निखाडे, दीपक कोकास, संतोष कुचनकार, संतोष माहुरे, अजिंक्य शेंडे, तालुका प्रमुख सतीश आदेवार, संजय भिजगुनवार, बंडू गुरनुले तसेच उपोषणकर्ते नेताजी पारखी, संदीप विंचू, संकेत गज्जलवार आदींसह शेकडो शिवसैनिक सहभागी झाले. या आंदोलनामुळे स्थानिकांमध्ये कंपनीविरोधातील असंतोष अधिक ठळकपणे समोर आला आहे.