सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : देशातील मूळ निवासी आदिवासी समाजाचे हक्क व आरक्षण वाचवण्यासाठी आदिवासी समाज आता रस्त्यावर उतरणार आहे. बंजारा व धनगर समाजाने अनुसूचित जमाती मध्ये आरक्षणाची मागणी करून त्यांच्या हक्कांवर डल्ला मारू नये, यासाठी वणी शहरात 29 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 12 वाजता इतिहासातील भव्य आरक्षण बचाव मोर्चा काढण्यात येणार आहे.
भीमालपेन देवस्थान, पाण्याची टाकी येथून मोर्चाला सुरुवात होईल. आदिवासी हक्क कृती समितीच्या नेतृत्वाखाली आयोजित या मोर्चात वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील सकल आदिवासी बांधव हजारोंच्या संख्येने सहभागी होण्याची शक्यता आहे.
मोर्चाच्या शेवटी उपविभागीय अधिकारी वणी यांना निवेदन देण्यात येणार असून त्यात स्पष्ट मागणी केली जाणार आहे की,
१) अनुसूचीत जमाती प्रवर्गामध्ये बंजारा, धनगर व इतर कोणत्याही जातीचा समावेश करण्यात येऊ नये.
२) आदिवासी विकास विभागाचा निधी इतरत्र वळवू नये. वळविलेला निधी व्याजासहीत आम्हाला परत करण्यात यावा.
३) आदिवासी आश्रम शाळेतील शिक्षण भरती तात्काळ करण्यात यावे.
४) बोगस आदिवासींना देण्यात आलेले सेवा संरक्षण मागे घेऊन त्यांना बडतर्फ करण्यात यावे व त्या ठिकाणी तात्काळ खऱ्या आदिवासींची नोकर भरती करण्यात यावे.
५) १७ संवर्गातील पेसा अंतर्गत नोकर भरती कायम स्वरुपी नियुक्ती करण्यात यावी.
आदिवासी बांधवांच्या हक्कांवर कुणीही गदा आणल्यास तीव्र आंदोलन उभे राहील, असा इशारा आयोजकांनी दिला आहे.
या मोर्चामुळे वणी शहरात प्रचंड उत्सुकता व चळवळ पाहायला मिळत असून, परिसरात “आरक्षण वाचवा – आदिवासी वाचवा” असा घोषणांचा गजर घुमण्याची तयारी आहे.
