सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : बिहारमधील बुद्धगया महाबोधी विहार या जागतिक वारसा स्थळाच्या व्यवस्थापनाबाबतचा वाद बौद्ध संघटना व इतर समाज यांच्यात सुरू आहे. बौद्ध संघटनांनी हे पवित्र विहार बौद्ध भिक्षूंच्या ताब्यात द्यावे, अशी मागणी अनेक वर्षांपासून होत असून देशभर आंदोलने सुरू आहेत.
या मागणीला पाठिंबा दर्शवण्यासाठी आज गुरुवारी मारेगाव तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मारेगाव तहसीलवर विराट मोर्चा धडकला. हजारो कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित राहून प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
मोर्चाचे नेतृत्व
मारेगाव येथील बदकी भवन पासून सुरू झालेल्या या विराट मोर्चाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ. निरज वाघमारे आणि वणी विधानसभा प्रमुख राजू निमसटकर यांनी केले.
घोषणांनी गजबजला तहसील परिसर
महाविहार बौद्ध भिक्षूंच्या ताब्यात द्या, सनातनी व्यवस्थेतून मुक्त करा, शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा, सातबारा कोरा करा, मारेगाव तालुका ओला दुष्काळ जाहीर करा… अशा घोषणांनी मोर्चा परिसर दुमदुमला. सरकारच्या तुघलकी धोरणाचा निषेधही यावेळी जोरदार करण्यात आला.
आंदोलनाची पार्श्वभूमी
महाबोधी विहार हे बौद्ध धर्मियांचे प्राचीन व पवित्र श्रद्धास्थान असून सुमारे २ हजार वर्षांपूर्वी बांधले गेले आहे. जगभरातील बौद्ध बांधवांचे हे प्रार्थनास्थळ असून युनेस्कोने त्याला जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता दिली आहे. तरीदेखील या विहाराच्या व्यवस्थापनावर इतर धर्मियांचे नियंत्रण असल्याने बौद्ध समाजात असंतोष आहे.
अनेक महिन्यांपासून बौद्ध भिक्षूंनी याविरोधात देश-विदेशात लढा उभारला आहे. याच पार्श्वभूमीवर मारेगावातील आजचा मोर्चा विशेष लक्षवेधी ठरला.
प्रमुख मागण्या
मोर्चेकरांनी “महाबोधी विहार तात्काळ बौद्ध भिक्षूंच्या स्वाधीन करा” अशी ठाम मागणी तहसील प्रशासनासमोर ठेवली. शेतकऱ्यांचे कर्ज माफ करून सातबारा कोरा करा, मारेगाव तालुका ओला दुष्काळ जाहीर करा आदी मागण्या होत्या.
या यशस्वी आंदोलनासाठी मारेगाव तालुका वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला.