सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : नगराची ग्रामदेवता असणाऱ्या आई जैताईच्या शारदीय नवरात्र उत्सव सुरू आहे. गेल्या सोळा वर्षांपासून प्रदान होत असलेल्या यावर्षीच्या जैताई मातृगौरव पुरस्काराने सेवानिवृत्त मुख्याध्यापक तथा सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते माधव गंगाधर सरपटवार यांना, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते, दैनिक तरुण भारताचे संपादक शैलेश पांडे यांच्या यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर वणी नगरीचे भूतपूर्व आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार, सुप्रसिद्ध व्यावसायिक आशुतोष शेवाळकर, उमरेड येथील दानदाते मनोहर अंबादास उमरेड यांचे सुपुत्र डॉ. सौरभ बरडे, सुप्रसिद्ध व्यावसायिक विजय चोरडिया सामाजिक कार्यकर्त्या डॉ. संध्या पवार तथा विद्यावाचस्पती प्रा.स्वानंद गजानन पुंड हे मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या आरंभी प्रणिता पुंड आणि अमृता अलोणे यांनी शारदा स्तवन, देवी वंदन आणि मातृगौरव गीत सादर केले. त्यांना संवादिनीवर दादाराव नागतुरे आणि तबल्यावर नामदेव ससाणे यांनी साथ संगत केली. स्वानंद पुंड यांनी प्रास्ताविकामध्ये या पुरस्काराची पार्श्वभूमी स्पष्ट करीत माधव सरपटवार यांच्या कार्याचा गौरव केला. प्रमुख मान्यवरांच्या हस्ते जैताई मातृगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नंतर अनेक संस्था आणि व्यक्तींच्यावतीने माधव सरपटवार आणि भारती सरपटवार यांचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी विविध संस्थांच्याद्वारे दैनिक तरुण भारताचे संपादकपद भूषविण्याबद्दल शैलेश पांडे यांचादेखील सत्कार करण्यात आला. सुनील इंदुवामन ठाकरे यांनी संपादित केलेल्या माधव सरपटवार यांच्या जीवनावर आधारित ‘माझे जीवन गाणे’ या पुस्तिकेचे शैलेश पांडे आणि मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले.
याप्रसंगी तारा कुलकर्णी, सचिन सरपटवार यांनी गुणगौरवपर मनोगत व्यक्त केले. माधव सरपटवार यांच्यासारख्या समर्पित कार्यकर्त्याचा हा यथोचित गौरव आहे अशा शब्दात माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांनी प्रसन्नता व्यक्त केली. आपल्या मनोगतामध्ये शैलेश पांडे यांनी अशा स्वरूपातील मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व आपल्यामध्ये उपस्थित असल्याचा आनंद व्यक्त करीत त्यांच्या प्रदीर्घ आयुष्यासाठी जैताई चरणी प्रार्थना केली.
उमरेड येथील स्वर्गीय अंबादास बा. बरडे आणि स्वर्गीय लक्ष्मीबाई अंबादास बरडे यांच्या स्मरणार्थ डॉ. मनोहर अंबादास बरडे यांनी दिलेल्या अकरा लाख रुपये देणगीतून उभारण्यात आलेल्या भक्तनिवासाचे उद्घाटन डॉ. सौरभ तथा डॉ. प्राजक्ता बरडे यांच्या हस्ते संपन्न करण्यात आले. देवस्थानच्या वतीने सचिव ह.भ.प. मनु महाराज तुगनायत यांनी या दाम्पत्याचा सत्कार केला.
आजवरच्या मी जगदंबेच्या चरणी केलेल्या सेवेचा प्रसाद स्वरूपात आपल्या सगळ्यांच्या प्रेमाने ओतप्रोत भरलेला हा पुरस्कार मी सादर स्वीकार करतो अशा शब्दात माधव सरपटवार यांनी मनोगत व्यक्त केले. सुनील इंदुवामन ठाकरे यांनी पुस्तकाच्या प्रकाशन निमित्ताने आपल्या भावना व्यक्त करत भाष्य केले. अध्यक्षीय मनोगतामध्ये जीवनामध्ये मार्गदर्शन करणारी अशी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वे आपल्याला सकारात्मक मार्गावर चालण्याचा विश्वास प्रदान करतात असे विचार विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जैताई देवस्थानचे सचिव मनू महाराज तुगनायत यांनी तर आभार प्रदर्शन सदस्य प्रा. चंद्रकांत अणे यांनी केले. डॉ. ऐश्वर्या अलोणे यांनी सादर केलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाला वणीकर जनतेसह मुंबई, नागपूर, चंद्रपूर आणि यवतमाळ येथून देखील माधव सरपटवार यांच्यावर प्रेम करणारे लोक बहुसंख्येने उपस्थित होते.

