सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : देशात २२ सप्टेंबरपासून दुर्गा उत्सव सुरु होणार आहे. वणी उपविभागात नवरात्री उत्सव नऊ दिवस मोठया आनंदात साजरा होतो. या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर वणी विधानसभा क्षेत्रातील (वणी, झरी, मारेगाव) येथील मटण, चिकन व मच्छी मार्केट दहा दिवस बंद ठेवावेत, अशी मागणी युवा सेना उपजिल्हाप्रमुख अजिंक्य शेंडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनातून करण्यात आली.
नवरात्रीत उपवास, व्रत आणि पूजाअर्चा मोठ्या श्रद्धा व भक्तीभावाने केली जाते. अशा पवित्र काळात मांसविक्री सुरू राहिल्यास नागरिकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जातात, असा दावा निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित व्यावसायिकांना पत्रक देऊन दुकाने बंद करण्याचे आदेश प्रशासनाने तातडीने द्यावेत, तसेच उघड्यावर मांसविक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
निवेदन देतेवेळी अजय चन्ने, कुंदन पेंदोर, राहुल कोलते, साकेत भुजबलराव, तुषार काकडे, निखिल मडावी, सोनू नरड, मनोज वाकटी, गौरव पांडे यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.